Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 July, 2008

मोतीडोंगरावर शस्त्रसाठा सापडला

सोडून दिलेल्या ट्रकमधून नव्या कोऱ्या तलवारी हस्तगत
पोलिसांच्या लपवाछपवीमुळे शहरात अफवांचे पीक
मडगाव, दि.3 (प्रतिनिधी) - गेल्या आठवड्यातील येथे उसळलेल्या जातीय संघर्षाची धूळ खाली बसण्याच्या बेतात असतानाच येथील वादग्रस्त मोतीडोंगरावर पोलिसांना आज एका ट्रकमध्ये लपवून ठेवलेल्या स्थितीत मोठ्या संख्येने शस्त्रे सापडल्यामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. ट्रकमध्ये फक्त 17 तलवारी सापडल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी या प्रकरणात ट्रकचा वापर केला त्याअर्थी मोठ्या संख्येने शस्त्रे आणली गेली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे.
हा ट्रक कोणाचा, तो कोठून व कधी आला याबाबत पोलिस अधिकारी काहीही सांगू शकलेले नाहीत. दुपारी साडेबारा वाजता सापडलेल्या या ट्रकाचा तपशील सायंकाळपर्यंत मिळू नये यात काही तरी काळेबेरे आहे व मोठ्या संख्येने त्यातून शस्त्रे आणून ती कुठेतरी सुरक्षित उतरवली असावीत, अशी चर्चा आहे.
आज सायंकाळी हे वृत्त सर्वत्र पसरले व तो चर्चेचा विषय बनला. तथापि, अधिकृत माहिती न मिळाल्याने व पोलिसांनीही मौन पाळल्याने अफवांना ऊत आला.
सायंकाळी उशिरा दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, मोती डोंगरावर एक ट्रक गेले चार दिवस सोडून दिलेल्या अवस्थेत असल्याची माहिती हाती आल्यानंतर पोलिसांनी लगेच तेथे जाऊन त्याची तपासणी केली. त्यावेळी त्या ट्रकच्या ड्रायव्हर सीटमागे लपवून ठेवलेल्या 17 नव्या तलवारी म्यानासकट सापडल्या. जीए 01-डब्ल्यू -5785 क्रमांकाचा हा ट्रक लगेच जप्त करून पोलिस स्थानकात आणण्यात आला. नंतर खबरदारीपोटी तो कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर नेऊन ठेवण्यात आला.
या तलवारींपैकी 4 तलवारी 23 इंच लांबीच्या, तर 13 तलवारी 31 इंच लांबीच्या होत्या. सदर ट्रक कोणाच्या मालकीचा आहे ते पाहाण्यासाठी वाहतूक खात्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहितीही प्रभुदेसाई यांनी दिली. या ट्रकमधून आणखी शस्त्रे आणली जाण्याच्या शक्यतेबाबत विचारता ते पडताळून पाहिले जात असल्याचा खुलासा त्यांनी केला.
या ट्रकवर "अराफत रोडलाईन्स', वागेश्र्वरी ट्रान्सस्पोर्ट, मालक ः अब्दुल्ल मजीद दफीदार, मोबाईल ः 9822159061 असा उल्लेख आहे. त्याची नोंदणी फोंडा येथे झालेली असून वरील मोबाईल क्रमांकावर या प्रतिनिधीने संपर्क साधला असता तो कुणीही घेत नसल्याचे दिसून आले.

No comments: