Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 June, 2008

डाव्यांची बकवास नवी नाही : पंतप्रधान

संसदेचा सामना करण्याची तयारी
नवी दिल्ली, दि. ३० : अणुकराराच्या मुद्यावरून पाठिंबा काढून घेण्याची डाव्यांची धमकी नवीन नाही. सदैव बकबक करणे ही डाव्यांची सवयच झाली आहे. त्यांच्या धमकीला महत्त्व देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी, "आपले संपुआ सरकार अणुकरार करणारच' असे जाहीर केले. हा करार अंमलात आणण्यापूर्वी संसदेचा सामना करण्याची देखील आपली तयारी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
संपुआ सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे डावे पक्ष आणि सरकार यांच्यात अणुकरारावरून निर्माण झालेल्या कोंडींवर प्रथमच मौन सोडताना पंतप्रधान म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी चर्चा आणि राष्ट्रीय सुरक्षा कराराची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा सरकारला द्यायलाच हवी. या करारावर डाव्यांसह इतरांनी जे आक्षेप उपस्थित केले आहे त्यावर समाधानकारक उत्तर देण्यासाठी सरकार सक्षम आहे.
वातावरणातील बदलावर पंतप्रधानांच्या परिषदेने तयार केलेल्या राष्ट्रीय कृती योजनेचे विमोचन केल्यानंतर पंतप्रधान आपल्या निवासस्थानी काही ज्येष्ठ पत्रकारांशी बोलत होते. सरकारने कराराच्या दिशेने एक पाऊल जरी पुढे टाकले तरी पाठिंबा काढण्यात येईल, असा अंतिम इशारा काल माकपने दिला होता. या धोक्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, अशी वेळ आल्यानंतर आम्ही डाव्यांचे देखील समाधान करू. केवळ डाव्यांचेच नव्हे तर सर्वच पक्षांचे समाधान करण्याचे आमचे प्रयत्न सुरू ओहत.
सुरुवातीला पंतप्रधानांनी अणुकरारावर बोलण्याचे टाळले होते. कुठलेही भाष्य करण्यापेक्षा मौन राहणे केव्हाही योग्य असते, असे ते म्हणाले. पण, काही वेळातच त्यांनी डाव्यांना त्यांची जागा दाखविणारे वक्तव्य केले.
सरकारने जे अजिबातच करायला नको अशी कुठलीही गोष्ट मी मागत नाही. माझी एवढीच विनंती आहे की, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगासोबत चर्चेची प्रक्रिया सरकारला पूर्ण करू द्या. एक वचन देतो की, करार अंमलात येण्यापूर्वी मी संसदेत येईल, संसेदच्या निर्णयाशी बांधिल राहील. यापेक्षा आणखी मोठी गोष्ट काय असू शकते. भाजपा आणि डावे पक्ष दोघांनाही या करारावर संसदेत चर्चा करण्याची संधी मिळेल. त्यानंतरही जर सरकारने काहीतरी चुकीचे केले असे संसदेला वाटले तर संसद सांगेल तेच सरकार करेल, असे मनमोहनसिंग यांनी सांगितले.
डाव्यांनी पाठिंबा काढला तर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घेणार काय, असे विचारले असता, "मला लोकसभेची मध्यावधी कुठेच दिसत नाही. कारण, अशा प्रकारच्या धमक्या देण्याची डाव्यांची ही पहिली वेळ नाही. त्यांची ती सवयच आहे,' असे पंतप्रधान म्हणाले.

No comments: