Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 June, 2008

मुस्लिमांचा ओढा भाजपकडे : डॉ. नाहीद शेख

'या समाजाच्या अधोगतीला कॉंग्रेसच जबाबदार'
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): देशातील मुस्लिम समाज भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या सत्तेखालीच सुरक्षित राहू शकतो. या समाजाच्या अधोगतीला कॉंग्रेसच पूर्णपणे जबाबदार आहे. अल्पसंख्य म्हणून गोंजारून कॉंग्रेस पक्षाने एवढी वर्षे मुस्लिमांचा मतांसाठी वापर केला. तथापि, आता हा समाज जागृत होऊन देशपातळीवर तो मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळत चालल्याचे निरीक्षण भाजप अल्पसंख्य विभागाचे राष्ट्रीय सचिव तथा गोवा भाजप अल्पसंख्य विभागाचे नवनियुक्त राष्ट्रीय प्रभारी डॉ. नाहीद शेख यांनी नोंदवले. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी प्रदेश भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, गोवा भाजप अल्पसंख्य विभागाचे अध्यक्ष इब्राहिम मुसा व उपाध्यक्ष शेख सल्लाउद्दीन हजर होते. गोवा भाजप अल्पसंख्य विभागाची आज बैठक बोलावण्यात आली होती. डॉ. शेख यांनी या विभागाच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
भाजप हा जातीयवादी व हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे विष मुस्लिमांत पेरून कॉंग्रेसने आजपर्यंत आपली राजकीय पोळी भाजून घेतली. देशातील मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळत असल्यानेच कॉंग्रेस एवढी वर्षे सत्तेत राहू शकला. मुस्लिमांचा एवढा पुळका जर कॉंग्रेसला आहे तर इतकी वर्षे हा समाज एवढा मागासलेला का राहिला याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवालही डॉ. शेख यांनी केला.
गरिबी, निरक्षरता ही मुस्लिमांच्या पाचवीलाच पुजली असून या समाजाला अशाच परिस्थितीत ठेवून त्यांचा केवळ "वोट बॅक' राजकारणासाठी वापर करून घेणे हा एवढाच डाव कॉंग्रेसने आत्तापर्यंत साधला असा ठपकाही त्यांनी ठेवला. सध्या कॉंग्रेसच्या या स्वार्थी राजकारणाचा बुरखा हळूहळू दूर होत असल्याने मुस्लिम समाज कॉंग्रेसपासून दुरावत चालला असून खरे निधर्मी व सुशासन हे भाजपच देऊ शकेल, ही गोष्ट त्यांना आता पटायला लागल्याचा विश्वास डॉ. शेख यांनी व्यक्त केला.
भाजप हा मुस्लिमव्देष्टा पक्ष असल्याचा अपप्रचार करून कॉंग्रेसने या समाजाला सतत भीतीच्या छायेखाली ठेवले. त्यामुळे भाजपचे उघडपणे समर्थन करण्यास अजूनही हा समाज कचरत आहे. तथापि, अल्पसंख्य विभागातर्फे या समाजाला उघडपणे भाजपची साथ देण्याचे मार्गदर्शन व बळ प्राप्त करून दिले जाणार आहे. गोव्यात अल्पसंख्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मनातील भाजप पक्षासंबंधी असलेला गैरसमज दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे डॉ. शेख यांनी सांगितले.
या समाजाला अल्पसंख्य ठरवून त्यांना मुख्य प्रवाहातून वेगळे पाडणारा कॉंग्रेस हाच खरा जातीयवादी व धार्मिक पक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला.

No comments: