Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 29 June, 2008

मडगावात जमावबंदी मागे

मडगाव, दि. 29 (प्रतिनिधी) - गेल्या शुक्रवारपासून तणावपूर्ण असलेली मडगाव व सभोवतालच्या परिसरातील स्थितीत आज पूर्णत ः सुधारणा दिसून आल्यानंतर प्रशासनाने आज सायंकाळी जमावबंदी आदेश मागे घेतला. गेल्या शुक्रवारी सायंकाळी हिंसक दंगलींची शक्यता लक्षात घेऊन तो जारी केला गेला होता.
मात्र 144 कलमाखालील हा आदेश मागे घेतला तरी खबरदारीपोटी सर्व मोक्याच्या जागी पोलिस बंदोबस्त अजून ठेवण्यात आलेला आहे तसेच फिरती पोलिस गस्तही चालू आहे. आज पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई उपअधीक्षक उमेश गावकर यांना घेऊन विविध भागांत फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेताना दिसले. दुसरीकडे शुक्रवारी रात्री उशिरा अटक केलेल्या सर्व 17 ही जणांना आज पोलिस कोठडीतून मुक्त करण्यात आले. त्यांतील 5 जणांवर घर व दुकानाची मोडतोड केल्याचा तर बाकीच्या 12 जणावर बंदसाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे.
शुक्रवारी सायंकाळी बंद झालेला बाजार काल हिंदू संघटनांनी दिलेल्या "बंद 'च्या आवाहनामुळे बंद राहिला तर आज रविवार म्हणून बंद राहिला . उद्या तब्बल अडीच दिवसांनंतर येथील बाजारपेठ पूर्णतः उघडली जाणार आहे. आज गांधी मार्केट उघडे होते व तेथे नेहमीप्रमाणे व्यापार झाला. मात्र तेथील पोलिस पहाऱ्यामुळे ग्राहक आत जाताना बिचकत होते. उपनगरी भागातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालल्याचे सूत्रांनी सांगितले. धार्मिक स्थळावरील पोलिस सुरक्षा अजूनही तशीच आहे.

No comments: