Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 30 June, 2008

७ जुलैपर्यंत बहुमत सिध्द करण्याचा आझादांना आदेश

श्रीनगर, दि.३० : पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी(पीडीपी)ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर अल्पमतात आलेल्या जम्मू-काश्मीर सरकारचे मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी ७ जुलैपर्यंत आपले बहुमत सिध्द करून दाखवावे, असे आदेश राज्यपाल एन. एन. वोरा यांनी दिले आहेत. अमरनाथ देेवस्थानला वनजमीन हस्तांतरीत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करीत पीडीपीने पाठिंबा काढून घेतला होता.
मुख्यमंत्री आझाद यांनीही राज्यपाल वोरा यांना पाठविलेल्या पत्रात, आपण सभागृहात केव्हाही बहुमत सिध्द करण्यास तयार आहोत, असे म्हटले आहे. पीडीपीने पाठिंबा काढून घेतल्यानंतरही विधानसभेत आजही आपल्यामागे बहुमत आहे, असा दावा आझाद यांनी या पत्रात केला आहे.
अमरनाथ देवस्थानला वनजमीन देण्याचा निर्णय व नंतर हा निर्णय मागे घेण्यावरून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असतानाच गुलाम नबी आझाद यांच्या घरी आज बऱ्याच राजकीय हालचाली दिसून येत होत्या. पीडीपीतील असंतुष्ट आमदार व बहुतांश अपक्ष आमदार आझादांना पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत. जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. चार सदस्य असलेली पॅंथर पार्टी आधीपासूनच आझाद सरकारच्या विरोधात आहे, हे येथे उल्लेखनीय.

No comments: