Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 2 July, 2008

भाजपतर्फे आज पणजीत 'धरणे'

अमरनाथ प्रकरण
पणजी, दि. २ (प्रतिनिधी) : अमरनाथ देवस्थान मंडळाला यात्रेकरूंच्या निवासधामासाठी दिलेली जागा परत घेण्याची जम्मू-काश्मीर सरकारची कृती अत्यंत घृणास्पद व जातीयवादाचे जाहीर समर्थन करणारी आहे. भाजपने याप्रकरणी देशपातळीवर "भारत बंद'चे आवाहन केले असून या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश भाजपतर्फे उद्या (गुरुवारी) दुपारी ३ ते सायंकाळी ६दरम्यान पणजी जेटी येथे "धरणे' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार श्रीपाद नाईक यांनी ही माहिती आज येथे दिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर, माजी आमदार सदानंद शेटतानावडे उपस्थित होते. देशातून लाखो भाविक दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात. या लोकांना निवासाची तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे शंभर एकर जागा देण्यास केंद्र सरकारचीही मान्यता होती. असे असताना जम्मू-काश्मीर सरकारकडून आपलीच अधिसूचना मागे घेण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय अत्यंत दुर्दैवी व घातक असल्याची टीका श्री. नाईक यांनी केली.
देशात सर्व धर्मांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. हज यात्रेकरूंसाठी केंद्र सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. त्यास कुणीही आक्षेप किंवा विरोध केला नाही. मात्र आता अमरनाथ यात्रेकरूंच्या सोयीसाठी दिलेली जागा परत घेण्याचा प्रकार हा देशातील जातीयवादाला व धार्मिक तेढीला आमंत्रण देणारा ठरणार असल्याचा इशारा श्री. नाईक यांनी दिला. अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने येथील मुस्लिम बांधवांच्याही रोजीरोटीची सोय झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्ष ज्या पद्धतीने वागत आहेत ती कृती देशाच्या अखंडत्वाला घातक आहे. तसेच काही विघातक शक्तींकडून वारंवार काश्मीरी राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उपस्थित करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले जात असल्याचे श्री. नाईक म्हणाले.
केंद्र सरकारने या वक्तव्यांची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली. सच्चर समिती स्थापन करून देशातील मुस्लिमांना केवळ धर्माच्या नावाने वेगळ्या सुविधा देण्याचा घाट, अफझल गुरू या दहशतवाद्याची फाशी लांबणीवर टाकण्याची कृती, तसेच सैन्यात मुस्लिमांसाठी आरक्षण या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक जातीय मतभेद निर्माण करण्याचा प्रकार असल्याची टीकाही करण्यात आली.
गोव्यात बंद पुकारून येथील लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रदेश भाजप केवळ धरणे धरणार आहे. राष्ट्रभिमानी लोकांनी यात सामील होऊन देशात जातीयवादाची बिजे पेरणाऱ्या कृत्यांचा निषेध करावा,असे आवाहन त्यांनी केले.

No comments: