Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 July, 2008

विहिंपच्या "भारत बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

. देशभरात संतप्त पडसाद, जनजीवन प्रभावित
. इंदूरमध्ये हिंसक गालबोट ; 2 ठार
. चार ठाण्याच्या परिसरात संचारबंदी
. रेल्वे रोखल्या, रस्ते वाहतूकही "जाम'

नवी दिल्ली, दि.3 - श्रीअमरनाथ देवस्थान मंडळाला दिलेली वनजमीन परत घेण्याच्या जम्मू-काश्मीर सरकारच्या निर्णयाविरुद्ध विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टीने आज पुकारलेल्या "भारत बंद'ला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गुजरातपासून आसामपर्यंत व जम्मू-काश्मीरपासून तामीळनाडूपर्यंत जनजीवन प्रभावित झाले. हिंदू समाजाने मोठ्या संख्येत रस्त्यांवर उतरून राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबईसह देशभरातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये वाहतूक रोखली. बंदचा सर्वाधिक प्रभाव उत्तर भारतातील राज्यांमध्ये दिसून आला. इंदूर शहरात बंदला हिंसक वळण लागले. शहरातील हिंसक घटनेमध्ये दोन जण मृत्युमुखी पडल्याचे व पाच जण जखमी झाले असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. तसेच चार पोलिस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीमध्ये भारत बंदचा चांगला प्रतिसाद दिसून आला. बहुतांश शाळा, महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली. अनेक बाजार पेठा बंदच होत्या. आंदोलकांनी दिल्ली-नोएडा, दिल्ली-आग्रा आणि दिल्ली-अमृतसर या महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. यामुळे जनजीवन प्रभावित झाले.
आग्रा कॅन्टोनमेंट येथे भाजपा व विहिंपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस दीड तासांपर्यंत रोखून धरली.
आर्थिक राजधानी मुंबईतही बंदचा प्रभाव दिसून आला. सांताक्रुझ, पश्चिम द्रुतगती मार्ग, बोरिवली येथे वाहतुकीच्या वेग फारच मंदावलेला दिसून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली उपनगरात आंदोलकांनी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत बेस्टच्या अनेक बसेसची मोडतोड झाली. तथापि, या दगडफेकीत कुणालाही इजा झाल्याचे वृत्त नाही. वाकोला, बोरिवली, मालाड या शिवाय घाटकोपर येथेही वाहतूक रोखल्या गेली. यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूकही रोखली गेल्याने रस्त्याच्या उभय बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.
जम्मू, पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, गुजरात, पश्चिम बंगाल,आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र या सर्वच राज्यांमध्ये बंद चा प्रभाव जाणवला.
डाव्यांची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये बंदचा संमिश्र प्रभाव पडला. प्रवासी वाहतूक नित्याप्रमाणेच सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, रेल्वे प्रवासी गाड्या रोखून धरल्याने रेल्वे सेवा कोलमडली. सियाल्दा सेक्शनमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी रेल्वेमार्ग अडविल्याने रेल्वे सेवा प्रभावित झाली. कर्नाटनकमधील अनेक शहरांमधील व्यापारी प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंदच ठेवण्यात आल्या. दक्षिणा, उडुपी, म्हैसूर, कोडागू, हुबळी-धारवाड परिसरात बंदचा चांगलाच प्रभाव पडला. महाराष्ट्रात ठाणे व नागपूरमध्ये बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ठाणे शहरामध्ये बंद समर्थकांनी दुकाने बंद केली. पंजाबमधील लुधियाना शहरात काढण्यात आलेल्या निषेध रॅलीचे नेतृत्व विधासभेचे उपसभापती सतपाल घासैन यांनी केले. भटिंडा, अम्बाला, रोहतक, लुधियाना, राजपुरा, फगवाराआणि कर्नाल परिसरातही बंदचा चांगला प्रभाव दिसून आला. चंदीगढमध्ये दुकाने बंद करायला लावणाऱ्या हिंसक आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.मात्र, यात कोणालाही दुखापत झाली नाही.
उत्तरप्रदेशात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. आग्रा, मुगलसराय, कानपूर आणि अलाहाबादमध्ये बंद समर्थकांनी रेल्वेमार्गावर धरणे दिल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली संपूर्ण राज्यातून शंभरावर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
इंदूरमध्ये हिंसाचारात दोन ठार
इंदूरमध्ये बंददरम्यान झालेल्या हिंसक घटनेत दोन जण ठार, तर पाच जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हिंसक घटनांमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून पंढरीनाथ, छत्रीपूर, खजराना आणि मल्हारगंज चार पोलिस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भोपाळ, इंदूर, जबलपूर, देवास आदी प्रमुख शहरांमध्ये बंद समर्थकांनी दुकाने बंद केली. भोपाळमध्ये बसेसचीही तोडफोड केल्याचे वृत्त आहे. शहरातील खाजगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. इंदूरमध्ये "रिलायन्स फ्रेश'मध्ये घुसून कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
बंद समर्थकांशी विरोधी गटाचा संघर्ष झाला. यावेळी तुफान दगडफेक देखील झाली तसेच जाळपोळीच्याही घटना घडल्या. हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

No comments: