Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 1 July, 2008

गोवा लवकरच"सिमी'चे मुख्य केंद्र!

गुप्तचर संघटनेला प्राप्त झालेली माहिती
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : शांत व दहशतवादमुक्त प्रदेश म्हणून ख्याती असलेला गोवा आता "सिमी' या दहशतवादी संघटनेचे मुख्य केंद्र बनण्याची शक्यता आहे. "स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) या संस्थेचा दहशतवादी कारवायांत हात असल्याने या संघटनेवर २००१ सालापासून बंदी घालण्यात आली आहे. तथापि, या संघटनेच्या छुप्या कारवाया अजूनही सुरू असून आता त्यांनी आपला डेरा गोव्याकडे वळवल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
शेजारील कर्नाटकातून आपली सूत्रे हाताळणाऱ्या या संघटनेने आता आपला तळ गोव्यात हलवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या संघटनेचा सुमारे साठ टक्के भाग गोव्यात हालवल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर विभागाने उघड केली आहे. कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने "सिमी'च्या कारवायांना तेथे पायबंद घातला जाणार हे उघडच आहे. म्हणूनच त्यांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवण्याचे ठरवले आहे.
यासंबंधी गुप्तचर विभागाने मिळवलेल्या खात्रीलायक माहितीनुसार कर्नाटकातून "सिमी' गोव्यात आपला डेरा हलवण्यासाठी सक्रिय बनली आहे. अलीकडेच कर्नाटकांत अटक करण्यात आलेला "सिमी' चा कार्यकर्ता मोहम्मद असिफ याची नार्को चाचणी घेण्यात आली असता ही माहिती उघड झाली. गोव्यातील पोलिसांना दहशतवादी कारवाया हाताळण्याचा कसलाही अनुभव नाही; तसेच गोव्यातील खास गुप्तचर विभागही नाकाम असल्याने गोवा हेच सुरक्षित राज्य असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी "सिमी' च्या गोव्यातील कारवायांबाबत केलेल्या वक्तव्यावर असिफ यांच्या नार्को चाचणीनंतर शिक्कामोर्तब झाल्याने आता पोलिस यासंबंधी नक्की काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गोव्यात आपला तळ हटविण्याचा आणखीनही वेगळा उद्देश "सिमी'ने आखला आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असल्याने येथे "बॉम्बस्फोट' किंवा दहशतवादी हल्ला केल्यास हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजू शकतो. गोव्यात सुरक्षेच्या बाबतीत पोलिस निष्क्रिय असल्याचा अभ्यासही या संघटनेने केला आहे. दरम्यान,यासंबंधी पोलिसांनी अलीकडेच या कारवायांबाबत माहिती असल्याचे मान्य करून त्याचा लवकरच पर्दाफाश करण्याचे आश्वासन दिले होते. गोव्यात "सिमी' चे कार्यकर्ते येथील काही नक्षलवादी संघटनेशी संगनमत करून त्यांच्या मदतीनेच येथे आपले बस्तान जमवण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकात डेरेदाखल झालेल्या "सिमी'ला या राज्यात दहशतवादी कारवाया राबवणे शक्य झाले नाही. आता ही संघटना गोव्यात स्थलांतर होत असल्याने कर्नाटक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही हयगय परवडणारी नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकातील पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंध्र प्रदेश,उत्तरप्रदेश व कर्नाटकाप्रमाणे गोव्यात दहशतवादाचे प्रशिक्षण देणे,तसेच नव्या युवकांची नेमणूक करून हत्यारे व इतर सामुग्रीची तस्करी करण्याचेही त्यांनी ठरवल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. अशा युवकांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून आपल्या कळपात सामील करून घेण्याची योजनाही या संघटनेकडून आखण्यात आल्याची माहिती मिळते.

No comments: