Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 3 July, 2008

केंद्राला पाठिंब्याबाबत 6 जुलैनंतर घोषणा

- अणुकरारावर राष्ट्रीय चर्चा आवश्यक
- शास्त्रज्ञांचीही मते जाणून घेणार
- डाव्यांवरही साधले शरसंधान

नवी दिल्ली, दि.3 -अणुकरारावरून डावे पक्ष संपुआ सरकारचे समर्थन मागे घेण्याच्या निर्णयाप्रत आले असताना आपले सरकार टिकवून ठेवण्यासाठी संपुआचे नेतृत्व करणाऱ्या कॉंग्रेसने आता समाजवादी पक्षाकडे लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेस आणि सपा यांची जवळीक वाढत असल्याचे सर्वत्र बोलले जात असताना तिसऱ्या आघाडीत तर फूट पडणार नाही ना, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे आज तिसऱ्या आघाडीतील नेत्यांनी येथे एक बैठक घेतली आणि नंतर पत्रकार परिषदेत "आम्ही एक आहोत', असे जाहीर केले.
ज्या अणुकरारावरून संपुआच्या पायाखालची वाळू सरकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे, त्या अणुकराराबाबत राष्ट्रीय चर्चा घडवून आमजनतेची सहमती घ्यावी. याशिवाय आम्हीही या कराराबाबत तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांशी चर्चा करू आणि नंतरचे आपले मत तयार करू, असे या नेत्यांनी बैठकीनंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारला अणुकरारावरून समर्थन द्यायचे की नाही याबाबतच निर्णय 6 जुलैनंतर जाहीर केला जाईल, असेही या तिसऱ्या आघाडीचे प्रमुख मुलायमसिंग यांनी सांगितले. समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव व महासचिव अमरसिंग यांच्यासह तेलगु देसम्चे चंद्राबाबू नायडू आणि इंडियन नॅशनल लोकदलचे ओमप्रकाश चौटाला यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
संयुक्त राष्ट्रीय प्रगतिशील आघाडी (युएनपीए) नावाने ही तिसरी आघाडी याआधीच स्थापन करण्यात आली आहे. यात सहभागी असलेल्या समाजवादी पार्टी, तेलगु देसम्, इंडियन नॅशनल लोकदल व आसाम गण परिषद या चारच पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सचा एकही नेता बैठकीला उपस्थित नसल्यामुळे हळूहळू ही तिसरी आघाडी फुटणार तर नाही ना, अशी शंका राजधानीत वर्तविली जात आहे. अण्णाद्रमुक व एमडीएमके या पक्षांनी या आधीच या तिसऱ्या आघाडीतून आपले अंग काढून घेतले आहे. युएनपीएची स्थापना करण्यात आली तेव्हा या आघाडीत सात घटक पक्षांचा समावेश होता, हे येथे उल्लेखनीय.
समाजवादी पार्टी कॉंग्रेससोबत जाणार आणि तिसऱ्या आघाडीत फूट पडणार, अशा वावड्या सर्वत्र उठत असल्यामुळेच आज नवी दिल्ली येथील अमरसिंग यांच्या निवासस्थानी ही तिसऱ्या आघाडीची बैठक बोलाविण्यात आली होती. अणुकराराबाबत अमरसिंग यांनी केंद्र सरकारकडे स्पष्टिकरण मागितले होते. त्या स्पष्टिकरणावर आम्ही समाधानी नाही, त्यामुळेच आम्ही या संदर्भात तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची मते जाणून घेणार आहोत, असे यावेळी बोलताना चौटाला यांनी सांगितले. गरज पडल्यास आम्ही माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. कलाम यांचेही मत जाणून घेऊ, असे चौटाला यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. डॉ. कलाम यांनी याआधीच अणुकराराचे समर्थन केले आहे, हे येथे उल्लेखनीय.
इंधन दरवाढ आणि वाढती महागाई याबाबत सरकारविरुद्धची युएनपीएची भूमिका कायम आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे सांगून अमरसिंग म्हणाले की, अणुकरारातील मुलभूत मुद्यांवर विशेषज्ञांची मते जाणून घेणार आहोत. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् आणि पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही केली नाही, असेही अमरसिंग यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. अणुकरारापेक्षाही आपल्या देशाला जातीयवादापासून जास्त धोका असल्याचेही अमरसिंग म्हणाले.
सध्या तरी डावे पक्ष आमच्या तिसऱ्या आघाडीत नाहीत. मात्र, त्यांनी जर कॉंग्रेसचे समर्थन मागे घेतले तर त्यांना तिसऱ्या आघाडीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहणार नाही. भाजपासोबत तर ते जाणारच नाही, तसेच समर्थन मागे घेतल्यानंतर पुन्हा ते कॉंग्रेसची साथसंगत करणार नाही. त्यामुळेच त्यांना आमच्या आघाडीकडेच धाव घ्यावी लागेल, असेही अमरसिंग म्हणाले. अजून तरी डाव्या पक्षांनी संपुआ सरकारचे समर्थन मागे घेतलेले नाही, त्यामुळेच डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार तारून नेण्यासाठी सध्या तरी त्यांना कोणाच्या समर्थनाची गरज नाही, असेही अमरसिंग यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
देशातील राष्ट्रीय पक्षांमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात तिसऱ्या आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास चौटाला यांनी व्यक्त केला.
चंद्राबाबूंनी घेतली डाव्यांची भेट
तिसऱ्या आघाडीच्या या बैठकीआधी तेलगु देसम्चे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी डाव्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. समाजवादी पार्टीच्या कॉंग्रेससोबत वाढत असलेल्या जवळकीमुळे चिंताग्रस्त झालेल्या नायडू यांनी ही डाव्यांची भेट घेतली असल्याचे राजधानीत आज बोलले जात होते.
माकपा महासचिव प्रकाश कारत, भाकपा महासचिव ए. बी. बर्धन आणि माकपाचे वरिष्ठ नेते सीताराम येचुरी यांची भेट घेऊन नायडू यांनी त्यांच्यासोबत अणुकरारावर सुमारे 75 मिनिटे चर्चा केली. कॉंग्रेस शासीत आंध्रप्रदेशातील प्रमुख विरोध पक्ष असलेला तेलगु देसम् अणुकरार प्रकरणी डाव्यांच्या पाठीशी आहे.
या भेटीप्रसंगी नायडूंसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते येरन नायडू व राममोहन राव उपस्थित होते. येरन नायडू यांनी या आधी आठवड्याच्या सुरुवातीला कारत आणि बर्धन यांची भेट घेतली होती. ही एक वैयक्तिक बैठक होती, असे सांगून चंद्राबाबूंनी बैठकीतील माहिती देण्यास नकार दिला. या बैठकीत आम्ही अणुकरारावर चर्चा केली. यावेळी आम्ही त्यांना आपली भूमिका सांगितली आणि त्यांनी आपली मते मांडली, असे नंतर पत्रकारांसोबत बोलताना बर्धन यांनी सांगितले.

समर्थन मागे घेण्याबाबत
डाव्यांचा उद्या निर्णय

नवी दिल्ली, दि.3 0 भारत-अमेरिका अणुकराराबाबत पुन्हा एकदा आपल्या कठोरतेचे प्रदर्शन करीत संपुआ सरकारचे समर्थन आता मागे घ्यावेच लागेल, असा इशारा डाव्या पक्षांनी दिला आहे.
शुक्रवारी होणाऱ्या डाव्या पक्षांच्या बैठकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारचे समर्थन मागे घेण्याचा प्रस्ताव भाकपा मांडणार आहे, असे भाकपाचे महासचिव ए. बी. बर्धन यांनी आज येथे सांगितले. समर्थन मागे घेण्याची प्रक्रिया आणि पुढील भूमिकेबाबतही या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचेही बर्धन यांनी सांगितले. भाकपाची आज येथे आयोजित बैठक आटोपल्यावर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
123 करार आणि हाईड ऍक्ट देशहिताचा नाही, असे सांगून बर्धन यांनी महागाईच्या मुद्यावरूनही संपुआ सरकारवर ताशेरे ओढले.

No comments: