Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 May, 2008

शोएबसाठी उघडले
"आयपीए'लचे दार

एका महिन्यासाठी "बंदी' हटवली
लाहोर, दि. 4 - एका वेगवान घडामोडीत पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या अपीलविषयक लवादाने "रावळपिंडी एक्सप्रेस' उर्फ शोएब अख्तरवर घातलेली पाच वर्षांची बंदीला आज स्थगिती दिली. त्याला या लवादाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी "ना हरकत' दाखला दिला आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या कोलकाता रायडर्स संघात उत्साह संचारला आहे.
इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष ललित मोदी यांनी स्पष्ट केले की, "आयपीएल'मध्ये खेळण्यासाठी आपण त्याला ताबडतोब पाचारण करणार असून उद्या सकाळीच कोलकाता रायडर्स संघात दाखल होण्याचे आमंत्रण दिले जाईल.
अपील लवादाचे प्रमुख फारुक आफताब म्हणाले," आम्ही शोएबवर घालण्यात आलेली बंदी एका महिन्यासाठी स्थगित करत आहोत. यासंदर्भात पुढील सुनावणी 4 जून रोजी होईल.' त्याच्यावरील बंदी जर आम्ही स्थगित केली नसती, तर तो त्याच्यावर अन्याय ठरला असता.
ही बंदी स्थगित केल्यामुळे शोएबने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तो म्हणाला, मला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची उत्कंठा लागली होती. त्यामुळे ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे.
शोएबवरील बंदी उठवण्याची मागणी त्याच्या वकिलांनी लावून धरल्यामुळे लवादाने हे सकारात्मक पाऊल उचलले. कोलकाता नाईट रायडर्स संघाने शोएबशी 4 लाख 25 हजार अमेरिकी डॉलर्सचा करार केला आहे.
00000000
युसूफवरील बंदी पुढेही सुरूच
दरम्यान, इंडियन क्रिकेट लीगने पाकिस्तानचा कसोटीपटू मोहम्मद युसूफविरुद्ध दाखल केलेल्या दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, असा आदेश दिला. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळण्यासंबंधी त्याच्यावर घातलेली बंदी पुढे सुरुच राहणार आहे. .
आयपीएलमध्ये कोणत्याही प्रकारे सहभागी होण्यापासून मोहम्मद युसूफला रोखण्याचा अंतरिम आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती आयसीएलचे वकील हितेश जैन यांनी पत्रकारांना दिली.. ते पुढे म्हणाले की यासंदर्भातील अंतिम आदेश जुलैमध्ये दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायाधीशांचा हा आदेश आयपीएलसाठी पुरेसा सूचक आहे.
न्यायालयातर्फे अंतिम आदेश देण्याची तारीख पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. न्यायालयाने गेल्या वर्षी 15 डिसेंबरला अंतिम आदेश देईपर्यंत आयपीएलमध्ये खेळण्यापासून युसूफला रोखले होते.
या प्रकरणी न्यायाधीशांनी दिलेल्या मूळ आदेशाच्या आधारे आयसीएलने विविध आयपीएल संघांना युसूफची "खरेदी' केल्यास त्यांना कायदेशीर कारवाईला सामोर जावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर कोणत्याही बोलीदाराने युसूफला खरेदी केले नाही. परंतु आयपीएलने त्याला भरपाई म्हणून प्रारंभीच्या बोलीनुसार 3,50,000 अमेरिकी डॉलर्स दिले.
युसूफने सुरुवातीला इंडियन क्रिकेट लीगशी खेळण्याच्या करार केला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची खात्री देऊन आयसीएलशी केलेला करार मोडण्यास व आयपीएलशी करार करण्यासंबंधी त्याचे मन वळवले होते. मात्र, आयसीएलने करार मोडण्यास नकार देताना सांगितले की, आमच्याशी केलेल्या करारामुळे युसूफ कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही.

No comments: