Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 May, 2008

महागाईचा कळस!

केंद्र सरकारचा नाकर्तेपणा उघड
नवी दिल्ली, दि. ९ : महागाईने आज ७.५१ वरून ७.६१ चा टप्पा गाठत केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा नाकर्तेपणा उघड केला आहे. महागाईचा हा साडे तीन वर्षांच्या काळातील नवा उच्चांक आहे. "संयम राखा, विश्वास ठेवा' असे वारंवार आश्वासन देणाऱ्या या सरकारला महागाईच्या दरवाढीचे अचूक निदान काढता आले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चहा, मसाले, फळे, भाजीपाला आणि काही अन्नधान्याच्या किमती गेल्या आठवड्याच्या तुलनेत आणखी वाढल्याने महागाईचे हे चटके सोसणे सर्वसामान्यांना अशक्य झाले आहे.
सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेने महागाईवर आळा घालण्यासाठी गेल्या महिन्यात कंबर कसून सर्वच उपाय करून पाहिले. पण, महागाई कमी करणे तर सोडाच, आहे तो आकडा स्थिर ठेवणेही सरकारला जमले नाही. सर्व शासकीय उपायांना फाटा देत महागाईने २६ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात ७.६१ टक्के हा आकडा गाठला आहे. गेल्या वर्षी याच काळात महागाईचा दर ६.०१ टक्के होता. तर ६ नोव्हेंबर २००४ रोजी हा दर ७.७६ टक्के होता.
वायदा बाजारात येणाऱ्या काही वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घालून महागाई कमी करण्याचा सरकारचा प्रयत्नही अपयशी ठरला. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पत धोरण कठोर करताना रोख राखीव निधीचा दर (सीआरआर) ०.२५ टक्क्यांनी वाढविला. पण, यातही अपयशच आले. सरकारने सोमवारीच आणखी चार कृषी उत्पादनांना वायदा बाजारावरील बंदीच्या कक्षेत आणून पाहिले होते. सारेच उपाय अपयशी ठरल्यानंतर निरुत्तर झालेले अर्थमंत्री पी. चिदम्बरम आता पुन्हा एकदा लोकांना संयमाचा सल्ला देत आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने प्रती बॅरेल १२४ डॉलर असा दर गाठला असून, यामुळे हवाई वाहतुकीला लागणारे इंधन आणखी महाग होण्याची शक्यता आहे. अवघ्या एकाच आठवड्यात चहाच्या किमती ११ टक्क्यांनी तर, फळे आणि भाजीपाल्याच्या किमती प्रत्येकी एक टक्क्याने वाढल्या आहे. मसाले तीन टक्क्यांनी महाग झाले आहेत. ज्या सिमेेंटच्या किमती कमी झाल्याने महागाई कमी होईल, असा आशावाद सरकारला होता त्याच सिमेंटच्या किमतीत ०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिमेंट उद्योगांनी सिमेंटच्या किमती कमी कराव्या, असे आवाहन आज पुन्हा एकदा सरकारतर्फे करण्यात आले असले तरी सिमेंट उद्योगांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही.
चिदंबरम म्हणतात, दोन महिने धीर धरा
महागाई कमी करण्यासाठी सरकारने सर्वच स्तरांवर उपाय केले आहेत. पण, आणखी दोन महिने तरी महागाई कमी होण्याकरिता लागतील, असे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सांगितले आहे. महागाईवर आळा घालण्याचे सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत. आवश्यकता भासल्यास आणखीही काही कठोर पाऊले उचलण्यात येतील, अशी जुनीच ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली.
प्रशासकीय स्तरावर आणखीही काही पावले उचलण्यात येत आहेत. यापुढेही आवश्यकता भासल्यास योग्य ते उपाय करण्यात येतीलच. पण, त्याआधी किमती कमी करण्यासाठी सिमेंट उद्योगांवर दबाव आणण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे.
महागाईने आज ७.५७ वरून ७.६१ चा टप्पा गाठला असला तरी चिंता करण्यासारखे काहीच नाही. महागाईचा दर फार जास्त वाढला असे मुळीच वाटत नाही. सरकारने जी काही पावले उचलली आहेत त्यांना तूर्तास यश मिळणार नाही हे खरे असले तरी आगामी दोन महिन्यांच्या काळात महागाई कमी होईल, याची खात्री आहे. तेव्हा आणखी दोन महिने महागाईचे चटके सहन केल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगण्यासही अर्थमंत्री विसरले नाही.

...
रशियन राष्ट्राध्यक्षांना
भारत भेटीचे निमंत्रण

नवी दिल्ली, दि. ९ : पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले असून, मेदवेदेव यांनी ते स्वीकारले आहे. त्यांना निमंत्रण देताना पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.
गुरुवारी सायंकाळी पंतप्रधानांनी मेदवेदेव यांना फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्याचवेळी त्यांना भारत भेटीचेही निमंत्रण दिले. चर्चेच्या काळात दोन्ही नेत्यांनी उभय देशांच्या संबंधावर समाधान व्यक्त केले आणि द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, एका वेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी रशियाचे नवे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांचेही अभिनंदन केले. पुतीन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत रशिया-भारत संबंधात झालेल्या वृद्धीचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
...

No comments: