Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 May, 2008

रामसेतू हिंदूंच्या आस्थेचा विषय : अर्जुनसिंग

सोनिया गांधींविरुद्ध बंड?
नवी दिल्ली, दि. ८ (विशेष प्रतिनिधी): रामसेतू हा हिंदूंच्या आस्थेचा विषय असल्यामुळे त्याबाबत प्रश्नच उपस्थित केला जाऊ शकत नाही, हे वाक्य कोण्या हिंदू संघटनेच्या नेत्याच्या किंवा पदाधिकाऱ्याचे नसून रामसेतू प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्याचे आहे. हा नेता म्हणजे सध्या संपुआ मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री असलेले अर्जुन सिंग आहेत.
संपुआ सरकारने रामसेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रावरून अर्जुनसिंग यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे. जणू काही त्यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरुद्ध बंडच पुकारले आहे, असे दिसून येते. अर्जुनसिंग यांच्या मुलाखतीवर आधारित हिंदीचे लेखक कन्हय्यालाल टंडन यांनी लिहिलेल्या पुस्तकात कॉंग्रेस नेतृत्वावर करण्यात आलेल्या टीकांची नोंद करण्यात आली आहे. सध्या कॉंग्रेस पक्षात अर्जुनसिंग यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अर्जुनसिंग त्रस्त झाले आहेत. आधी पक्षात सल्लामसलत करून निर्णय घेतले जायचे, आता मात्र ही प्रक्रिया बंद झाली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष खदखदत आहे, असा आरोपही अर्जुनसिंग यांनी केला आहे.
हरयाणात भजनलाल यांचे पुत्र खासदार कुलदीप बिष्णोई, जम्मूकाश्मीरचे खासदार मदनलाल शर्मा आणि उत्तर प्रदेशचे कॉंग्रेस खासदार अखिलेश दास यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला खुले आवाहन दिले असतानाच टंडन यांचे हे अर्जुनसिंगांची मुलाखत असलेले पुस्तक प्रकाशित होत आहे.
सोनिया आणि राहुल सतत चापलुसी करणाऱ्यांच्या घेऱ्यात असतात आणि त्यांचे निर्णयही चुकीचे असतात, असा आरोप या तिन्ही खासदारांनी केला आहे. त्यामुळेच अर्जुन सिंग यांनीही कॉंग्रेसद्वारे घेतल्या जाणाऱ्या निर्णयावर कठोर टीका केली आहे. अर्जुन सिंगांच्या टीकेचे लक्ष्य अहमद पटेल असल्याचे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांच्या दरबारात अर्जुनसिंग यांचे महत्त्व आता कमी होऊ लागले आहे आणि अहमद पटेल यांचा दबदबा वाढला आहे. त्यामुळेच की काय गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुनसिंग यांना मंत्री पदावरून हटवून राज्यपाल म्हणून पाठविण्याचे कारस्थान रचले जात आहे. या कारस्थानामागे अहमद पटेल यांचा हात असल्याची अर्जुनसिंगांना शंका आहे. हे कारस्थान हाणून पाडण्याचा प्रयत्न अर्जुनसिंग गेल्या वर्षभरापासून सातत्याने करीत आहेत. राज्यपाल म्हणून जाण्यासाठी दबाव वाढत असतानाच अर्जुनसिंग यांनी ही मुलाखती दिली आहे.

No comments: