Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 May, 2008

गोमेकॉचे डॉ. सापेको यांचे निलंबन मागे

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : "गोमेकॉ'च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सिल्वानो सापेको याचे निलंबन मागे घेतल्याने ते आजपासून कामावर रुजू झाले. स्कार्लेट मृत्यू प्रकरणी पहिल्या शवचिकित्सेत हलगर्जीपणा ठपका ठेवून त्यांना २४ मार्च ०८ रोजी निलंबित करण्यात आले होते.
स्कार्लेट किलिंग या ब्रिटिश युवतीच्या खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी गोव्यात आलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी डॉ. सिल्वानो सापेको यांचे निलंबन पूर्णतः चुकीचे असल्याचे म्हटले होते.
डॉ. सापेको यांनी आपल्या अहवालात स्कार्लेटच्या अंगावर पाच जखमा असून स्कार्लेटचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले होते. त्यावेळी स्कार्लेटची आई फियोना हिने स्कार्लेचा खून झाल्याचा दावा करून दुसऱ्या शवचिकित्सेची मागणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या तीन सदस्यीय समितीने शवचिकित्सा केल्यावर स्कार्लेटच्या अंगावर तेवीस जखमा आढळल्याने डॉ. सापेको संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.यापूर्वीही त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते.
स्कार्लेटचा बुडूनच मृत्यू झाल्याचा दावा करणारे उपनिरीक्षक नेर्लन आल्बुकर्क यांच्यावरही निलंबित होण्याची पाळी आली होती. नंतर तर नेर्लन यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
स्कार्लेट खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करून या दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत होती. पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी याची गंभीर दखल घेऊन या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या विषयीचे एक पत्र गृहमंत्री रवी नाईक यांना पाठवण्यात आले होते.

No comments: