Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 8 May, 2008

कर्नाटकातील प्रचाराची आज सांगता
10 मे रोजी 89 मतदारसंघांत मतदान

बेळगाव, ता. 7 (प्रतिनिधी) - साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटकातील 224 विधानसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात येत्या 10 रोजी निवडणुका होत आहेत. त्याअंतर्गत तुमकूर हसन, कोडगू, म्हैसूर, मंड्या, रामनगर, बंगळूर (शहर) व ग्रामीण, कोलार आणि चिकबळापूर या जिल्ह्यांमध्ये 89 मतदारसंघांत मतदान होईल. यावेळी अनेक रथी महारथी निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या राज्यात भाजप, कॉंग्रेस, निधर्मी जनता दल व समाजवादी हे प्रमुख पक्ष निवडणूक लढवत आहेत. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेते राज्यात दाखल झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज्य आदी नेते धडाडीने प्रचार करत आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, निधर्मी जनता दलाचे एच. डी. देवगौडा यांनीही प्रचार चालवला आहे.
उद्या 8 मे रोजी सायंकाळी प्रचाराची रणधुमाळी शांत होईल. राज्यात यावेळी सर्वच मतदारसंघांमध्ये इलेक्टॉनिक यंत्रांचा मतदानासाठी वापर केला जाणार आहे. मतदारांना ओळखपत्रांची सक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी मतदान ओळखपत्र किंवा इतर कोणतेही ओळखपत्र मान्य केले जाईल.
दहा माजी मंत्री रिंगणात
तिसऱ्या टप्यामध्ये उत्तर कर्नाटकात 22 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये बेळगाव, धारवाडा कोप्पळ आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यात विविध पक्षांतर्फे 10 माजी मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राजमाला सावनूर, ओमप्रकाश कणगाडी प्रकाश कणगाडी, उमेश कत्ती, व्ही एस. कौजलगी, ए. बी. पाटील प्रकाश हुक्केरी, सतीश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, शशिकांत नाईक व डी. बी. इमानदार हे ते दहा माजी मंत्री होत.
धरमसिंग रेकॉर्ड करणार?
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री धरमसिंग हे कॉंग्रेसच्या तिकिटावर जेवरगी मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढवत आहेत. जर यावेळी ते विजयी झाले तर तो विक्रम ठरेल.
निवडणूक खर्चाबाबत ताकीद
निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने दर 3 दिवसांत एकदा याप्रमाणे केलेल सर्व खर्च निवडणूक आयोगाला सादर करावयाचा आहे. तसे न करणाऱ्या उमेदवारावर कारवाई करण्याची ताकीद निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, आजपासून प्रारंभ झालेल्या शिवजयंती व बसवजयंतीच्या उत्साहावर निवडणुकीमुळे आलेल्या काही बंधनांमुळे मर्यादा पडल्याचे दिसून आले.
ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व पूजन करण्यात आले सायंकाळी बसवजयंतीची मिरवणूक निघाली. शिवजयंतीची मिरवणूक 9 रोजी निघणार आहे.

No comments: