Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 May, 2008

पं.किशन महाराज यांचे देहावसान

वाराणशी, दि.५ : सुप्रसिद्ध तबलावादक पंडित किशन महाराज यांचे रविवारी रात्री उशीरा दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
काही दिवसांपूर्वीच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयातच होते. त्यातच काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला तेव्हा सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आपल्या कुटुंबासह त्यांची भेट घेण्यास आले होते. पं.किशन महाराज यांच्या मागे पत्नी बीनादेवी, तीन मुली आणि मुलगा पुरन महाराज तसेच बराच मोठा शिष्यपरिवार आहे. पुरन महाराज हेही तबलावादन करतात.
वयाच्या ११ व्या वर्षीपासून किशन महाराज यांनी तबलावादनास सुरुवात केली. ते बनारस घराण्याशी संबंधित होते. त्यांचे वडील पंडित हरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबलावादनाचे धडे घेतले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका पं. कांथे महाराज, पं. बलदेव सहाय यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. आपल्या काळातील सर्व तबलावादकांना मागे टाकीत त्यांनी या कलेत प्राविण्य मिळविले. असंख्य संगीत संमेलने गाजविल्यानंतर त्यांनी देश-विदेशातही तबलावादनाचे स्वतंत्र कार्यक्रम केले. कोणत्याही वाद्यासोबत ते जुगलबंदीसाठी तयार असत.
२००२ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रातील लोकांनी तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या असून पं. किशन महाराज यांच्या जाण्याने नव्या पिढीसमोरील एक आदर्श कलावंत हरपल्याचे म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील राज्यपालांनी पं. किशन महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

No comments: