Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 9 May, 2008

लईराईच्या जत्रेला उत्साहात आरंभ

डिचोली, दि. ९ (प्रतिनिधी): शिरगावच्या श्री देवी लईराईच्या प्रसिद्ध जत्रौत्सवाला आज सकाळपासूनच भाविकांचा महासागर लोटला होता. गोव्याबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, आदी राज्यांतून या जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्निदिव्य तथा होमकुंड.
जत्रेला पाच दिवस बाकी असतानाच धोंड मंडळी अग्निदिव्यातून जाण्यासाठी कडक सोवळे पाळतात. भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवी लईराईच्या जत्रेत होमकुंडातून जाण्यासाठी गावागावातील धोंड गुडीपाडव्यापासूनच शुचिर्भूत राहतात. महिनाभर फक्त शाकाहार घेणारे हे धोंड आज सकाळी शिरगावला दाखल व्हायला सुरवात झाली. तेथील पवित्र तळ्यात स्नान करून देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन ही मंडळी रात्री उशिरा होमकुंडातून देवीचा जयघोष करीत अग्निदिव्य करणार आहेत. जत्रौत्सवानिमित्त सकाळी अकरा वाजता "गोवादूत'च्या डिचोली प्रतिनिधीने शिरगावला भेट दिली. त्यावेळी अस्नोडा मुख्य मार्गापासूनच मोठ्या संख्येने भाविक शिरगावात प्रवेश करीत होते. धूत वस्त्रे परिधान करून हातात वेताची खास सजवलेली काठी घेऊन जेथे होमकुंड रचण्यात आले आहे त्यास प्रदक्षिणा घालत हे धोंड देवीच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. भाविकही या होमकुंडाला प्रदक्षिणा घालताना दिसत होते. जत्रेच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
देवीच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी लोटली होती. जत्रोत्सवानिमित्त सुमारे दोन किलोमीटरची फेरी भरली असून, गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

No comments: