Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 5 May, 2008

बुधियाच्या प्रशिक्षकाचा खुनी राज आचार्यची शरणागती

ओरिसाचे पोलिस गोव्याकडे निघाले
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): धावपटू बुधियासिंग प्रशिक्षक बिरंची दास याच्या खून प्रकरणी ओरिसा पोलिसांना हवा असलेला मुख्य संशयित संदीप ऊर्फ राज आचार्य (३५) आज दुपारी पणजी पोलिसांना शरण आला. लगेचच त्याला अटक करण्यात आली. याची माहिती गोवा पोलिसांनी ओरिसा पोलिसांना दिल्यानंतर ओरिसा पोलिसांचे एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गोव्याकडे निघाले आहे. राज आचार्य याच्यावर ओरिसात खंडणीचे ३० गुन्हे दाखल असून खून व अपहरण प्रकरणांतही ओरिसा पोलिसांना तो हवा आहे.
आचार्य आज मुंबईहून गोव्यात आल्यानंतर त्याने थेट गोवा पोलिस मुख्यालय गाठले. तेथे त्याने पोलिस अधीक्षकाची भेट घेऊन आपल्याला बिरंची दास खून प्रकरणात पोलिस शोधत असल्याने शरण यायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कोर्त यांनी ओरिसा पोलिसांना याची माहिती दिली. नंतर त्यांनी आचार्य याला ताब्यात घेऊन अटक केली. उद्या सकाळी त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून ओरिसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. ही माहिती पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिली.
१३ एप्रिल ०८ रोजी बुधियाचे प्रशिक्षक बिरंची दास हे ओरिसा स्टेट ज्युडो असोसिएशन'चा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. त्यांच्यावर जवळून नऊ एमएमच्या पिस्तुलातून पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यातील तीन गोळ्या बिरांची यांच्या मानेत, छातीत आणि पायात घुसल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून आचार्य याचे नाव पुढे आल्यापासून तो फरारी झाला होता. तेव्हापासून ओरिसा पोलिस त्याच्या मागावर होते. या प्रकरणातील दोघा संशयितांना यापूर्वी ओरिसा पोलिसांनी अटक केली आहे. बुधिया या चार वर्षीय मुलाने पुरी ते भुवनेश्वरपर्यंतचे ६५ कि.मी. अंतर न थांबता पूर्ण केल्याने त्याचे प्रशिक्षक दास नावारूपाला आले होते. दास यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा भाऊ संजय दास याने काही दिवसांपूर्वी आचार्य याचे धमकीचे फोन आपल्याला येत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
पोलिस माझ्या मागावर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर मी ओरिसा सोडून दिल्लीत गेलो. मग वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन बंगळूरला आलो. बंगळूर पोलिसांपुढेच शरण येण्याचा विचार मी केला होता. मात्र माझ्या वकिलांनी त्यास मान्यता दिली नाही. मग मीे मुंबई येथे बहिणीला भेटायला गेलो. मात्र तिची भेट झाली नाही. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या "शिवा' नामक बसद्वारे सकाळी येथे दाखल झालो, अशी माहिती आचार्य याने पणजी पोलिसांना दिली.
पोलिसांनी त्याची पूर्ण झडती घेतली असता कपडे आणि ११ हजाराची रोकड त्याच्याकडे सापडली. तथापि, कोणतेही शस्त्र मिळाले नाही.
ओरिसा पोलिसांनी आचार्य याला फरारी घोषित करण्याची मागणी करून भुवनेश्वर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आचार्य याला शरण येण्यासाठी काही तासांची मुदत दिली होती. यापूर्वी आचार्य याचा निकटचा साथीदार अक्षय बेहरा ऊर्फ चंगला हा भोपाळ येथे पोलिसांना शरण आला होता. तेव्हा त्याने आचार्य याचा या हत्या प्रकरणात हात असल्याची माहिती ओरिसा पोलिसांना दिली होती.
-------------------------------------------------------------------------------
मोबाईलमुळे सापडला...
मोबाईल सिग्नल्समुळे राज आचार्य याचा छडा लागला. आज सकाळी ओरिसा पोलिसांना आचार्य हा गोव्यात असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून जवळच्या पोलिस स्थानकावर शरण न आल्यास चकमकीत संपवण्याचा इशारा त्याला दिला. त्यामुळे आचार्य याने एका राष्ट्रीय हिंदी वृत्त वाहिनीच्या कार्यालयात दूरध्वनी करून गोवा पोलिसांना आपण शरण येत असल्याची माहिती दिली. अर्थात, संबंधित वाहिनीचा गोव्यातील प्रतिनिधी तेथे पोहोचण्याआधीच संशयित आचार्य हा पणजी पोलिस स्थानकात हजर झाला होता.
--------------------------------------------------------------------------------

No comments: