Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 6 May, 2008

ब्राडबॅंड हा 'महाघोटाळा' प्रकल्प 'बीएसएनएल'कडे सोपवा : पर्रीकर

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): माहिती तंत्रज्ञान खात्यातर्फे राबवण्यात येणारा "ब्रॉडबॅण्ड' प्रकल्प हा महाघोटाळा असून सरकारने ताबडतोब या कंपनीचे कंत्राट रद्द करून ते "बीएसएनएल' कंपनीकडे सोपवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पणजी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोेलत होते. युनायटेड टेलिकम्युनिकेशन कंपनीशी करार करून "पीपीपी' पद्धतीवर हा प्रकल्प राबवताना सरकारला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही असे सरकारकडून सांगितले जात आहे. तथापि, ही जनतेच्या डोळ्यांत धूळफेक असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.
या प्रकल्पाचे अर्धे कामसुद्धा पूर्ण झालेले नसताना पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणे म्हणजे पंतप्रधानांची नाचक्की करण्याचा प्रकार असल्याची टीका पर्रीकर यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत या प्रकल्पाचे काम पुढे रेटून तो जनतेच्या माथी मारल्यास सरकारी तिजोरीवर त्याचा अतिरिक्त बोजा पडेल. सरकारने हा प्रकल्प राबवताना दरवर्षी २८ कोटी रुपये संबंधित कंपनीला देण्याचे मान्य केले आहे, असा गौप्यस्फोट पर्रीकर यांनी केला. "बीएसएनएल'ची पायाभूत सुविधा सेवा उपलब्ध असताना त्यांच्याशी करार करण्याचे सोडून खाजगी कंपनीशी करार करण्यामागे काही लोकांचे उखळ पांढरे होण्याची शक्यता असल्याचा संशयही पर्रीकर यांनी व्यक्त केला.
माहिती तंत्रज्ञान संचालक गेले कोठे?
माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे सल्लागार एम. एन. राव हे कोठे गायब झाले आहेत, असा सवाल पर्रीकर यांनी केला आहे. मुख्य सचिवांकडे त्यांच्याबाबत चौकशी केली असता त्यांनी ते उपलब्ध नसल्याचे सांगितले. दरम्यान, श्री. राव यांची वेतनश्रेणी मंत्र्यांच्या शिफारशीद्वारे वाढवण्यात आली असताना अचानक त्यांचे नाहीसे होणे आश्चर्यकारक असल्याचे पर्रीकर म्हणाले.

No comments: