Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 21 March, 2008

धन्याला धतुरा, चोराला मलिदा!

ज्योती धोंड
'गोमेकॉ'मधील निवासी डॉक्टरांची अपुरी संख्या, एम.डी.-पद्व्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या न वाढवणे, कामचुकार, आळशी, दारूड्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार, परिचारिका आणि प्रशासकीय विभागातील रिक्त जागा न भरणे अशा विविध कारणांनी डॉक्टरमंडळी सध्या वैतागली आहेत. त्यातच मानद सेवेच्या नावाखाली सरकार आता खासगी सेवेतील डॉक्टरांना एका दिवसासाठी गोमेकॉत निमंत्रित करू पाहात असल्याने त्यांच्या जखमेवर जणू मीठ चोळले जात आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे ठरवल्या गेलेल्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकल्या जातात व अशा लांबणीवर टाकल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हेच निमित्त साधून आरोग्यमंत्री बाहेरच्या डॉक्टरांना येथे पाचारण करू पाहात आहेत. या संदर्भात बरेच सीनियर डॉक्टर आता काही प्रश्र्न उपस्थित करीत आहेत, की हे बाहेरचे शल्यविशारद जेव्हा रुग्णांवर शस्त्रक्रिया करून जातील तेव्हा त्या रुग्णांवर पुढील उपचार कोणी करायचे? अशा शस्त्रक्रिया यशस्वी किवा अपयशी ठरल्या तर त्यास कोणाला जबाबदार धरायचे? शस्त्रक्रिया झाल्यानंतरची काळजी ही महत्त्वाची असल्याने अशा रुग्णांना औषधे कोणी लिहून द्यायची हा यक्ष प्रश्र्न त्यावेळी उभा राहणार आहे. शिवाय तेथे वावरताना तेथील काही तडफदार आणि कार्यक्षम व्यक्तींना या डॉक्टर मंडळीकडून खासगी प्रॅक्टिसची आमिषे दाखवली जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. शस्त्रक्रिया विभागाचे एकेकाळी प्रमुख असलेले निष्णात सर्जन आणि इस्पितळाचे विद्यमान डीन डॉ. जिंदाल हे मूकपणे याकडे कसे पाहात आहेत, असा सवालही ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित करीत आहेत. पदव्युत्तर आणि पदविकाधारक निवासी डॉक्टरांच्या "सर्व्हिस बॉंड'ची कार्यवाही अजून होत नाही. सीनियर डॉक्टर्स आणि विभागांचे प्रमुख यांच्यापेक्षा राजकारण्यांची मते गोमेकॉत प्रभावी का ठरत आहेत? कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे? या बेपर्वाईच्या कारभाराची डीन डॉ. जिंदाल यांना काहीच कल्पना नाही का?
गोमेकॉसमोरची सध्याची गंभीर समस्या म्हणजे प्रत्येक विभागात जाणवणारा पात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा. मग ते ओपीडी असू द्या, कॅज्युअल्टी असू द्या, रुग्णांचे वार्ड असोत वा ऑपरेशन थिएटरे असोत प्रत्येक विभागात हा तुटवडा जाणवतो आहे. डॉक्टरांसाठी बॉंड पद्धतीची कार्यवाही होत नसल्याने निवासी डॉक्टर्स मिळणे कठीण जात आहे. खासगी प्रॅक्टिस न करता प्रामाणिकपणे गोमेकॉत सेवा बजावत आलेल्या सीनियर डॉक्टरांना आणखी एक गोष्ट खटकते व ती म्हणजे इस्पितळातील अन्य डॉक्टर्स आणि सर्जनांना नॉनप्रॅक्टिसिंग भत्ता सरकार अदा करत आले आहे. प्रत्यक्षात यातील काही डॉक्टर्स ड्युटीवर असताना व ड्युटी संपली की खासगी प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असतात, असा त्यांचा दावा आहे. आपले नाव उघड न करण्याच्या बोलीवर "गोवादूत'शी बोलताना काही विभागप्रमुख डॉक्टर म्हणाले की डीन डॉ. जिंदाल आणि प्रशासकीय अधिकारी डॉ.राजन कुंकळ्येकर इस्पितळात चालणारे हे सर्व गैरप्रकार उघड्या डोळ्यांनी कसे काय बघत आहेत? नोकरीतील शिस्त न पाळणारे, झिंगलेल्या अवस्थेत ड्युटीवर येणारे आणि आपले काम सोडून इस्पितळात भलतीच कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्र्न अनुत्तरित राहिले आहेत. बाहेरचे डॉक्टर आणि परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने अधिकारीवर्ग इस्पितळाच्या कारभाराची फेरआखणी कशी काय करू पाहतात, असेही या विभागप्रमुखांचे म्हणणे आहे. येथील विभागप्रमुख आणि सीनियर डॉक्टरांना वस्तुस्थिती माहीत असताना त्यांना डावलून ही सुधारणा शक्य आहे का? तेथील बऱ्याच सीनियर डॉक्टरांनी गोमेकॉ हे आपले दुसरे घर समजून कष्टपूर्वक सेवा बजावली, हजारो रुग्णांवर उपचार केले, देश आणि परदेशांत नाव कमावणाऱ्या कित्येक डॉक्टरांना त्यांनी घडवले असताना आरोग्यमंत्री या ज्येष्ठ डॉक्टरांना विश्र्वासात का घेत नाहीत, असा त्यांचा सवाल आहे. पैशांच्या मागे न धावता सेवाभावी वृत्तीने येथे वावरत आलेले हे ज्येष्ठ डॉक्टर्स आणि तत्सम कर्मचारीवर्गच या इस्पितळाला त्याचे जुने वैभव प्राप्त करून देऊ शकतो हे कोणीही नाकारू शकत नाही. ज्या ज्यावेळी एखादी समस्या उद्भवते त्या त्यावेळी तिच्या मुळाशी न जाता वरवरची मलमपट्टी केली जात असल्यानेच तेथील समस्या बळावत गेल्याचे आणखी एका डॉक्टरांनी सांगितले.
म्हापशातील आझिलो हॉस्पिटल आणि मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळातून अधिकाधिक रुग्ण गोमेकॉत पाठवण्याची अलीकडे जणू स्पर्धाच लागली आहे. याचे कारण देताना एका वरिष्ठ डॉक्टराने सांगितले की या ठिकाणी नेमलेले निवासी डॉक्टर त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणापासून दूरवर राहतात. या इस्पितळांच्या कॅज्युअल्टीत जेव्हा एखादा अत्यवस्थ रूग्ण आणला जातो तेव्हा निवासी कन्सलटंट डॉक्टर नसल्याने तेथील स्टाफ त्याची रवानगी सरळ गोमेकॉकडे करतात. गोमेकॉच्या वरिष्ठांना याची कल्पना नाही का? असल्यास हा प्रकार ते कसा सहन करीत आले आहेत?
वैद्यकीय उपकरणांचा अभ्यास करण्यासाठी खासगी व गोमेकॉच्या काही डॉक्टरांसह आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच दुबईला भेट दिली. हा दौरा म्हणजे पैशांची निव्वळ नासाडी होय. ही उपकरणे तपासण्यासाठी दुबईला जाण्याची काय गरज होती? तुम्ही नुसता एक फोन करा आणि या विदेशी कंपन्यांचा प्रतिनिधी तुमच्या दारात उभा ठाकतो, अशी माहिती एका डॉक्टराने दिली. या व अशा अनेक प्रकारांनी गोमेकॉतील अनेक ज्येष्ठ डॉक्टर्स आणि विभागप्रमुख वैफल्यग्रस्त बनले असून आता अधिक सहन करण्याऐवजी सरळ "व्हीआरएस' घेऊन किंवा राजीनामा देऊन गोमेकॉतून बाहेर पडण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत आहे. तसे झाल्यास गोमेकॉला घरघर लागण्याचा दिवस फार दूर नाही.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys