Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 March, 2008

दक्षिण गोव्यात जोरदार पाऊस

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : ढगांचा गडगडाट व विजांचा चकचकाट यांच्याबरोबरीने आलेल्या पावसाने राज्यातील अनेक भागांत आपली हजेरी लावली. पावसाचा जास्त प्रभाव संध्याकाळी दक्षिण गोव्यात जाणवला. काणकोण, सांगे आदी भागांत जोरदार पाऊल पडल्याचे आमच्या प्रतिनिधींनी कळविले आहे. रात्री ९ वाजल्यापासून मडगाव शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. रात्री १० वाजेपर्यंत पाऊस अक्षरशः ओतत होता व त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्ते पाण्याखाली आले तर काही ठिकाणी कचरा रस्त्यावर आला. गडगडाटामुळे विजेचा लपंडाव चालूच होता. दुपारपासून वाढलेला उष्मा मात्र या जोरदार पावसामुळे कमी झाला.
केरळ ते विदर्भ या विभागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने येत्या २४ तासांत गोव्याच्या काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेचे प्रमुख के.व्ही. सिंग यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोवेकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मात्र राज्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे तेथील लोकांना दिलासा मिळाला. दिवसा ढगाळ वातावरण असल्याने रात्री आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.
गेल्या २४ तासांत राज्यामध्ये कमाल ३३.१ आणि किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हीच स्थिती अजून दोन दिवस राहण्याची शक्यता सिंग यांनी व्यक्त केली.

No comments: