Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 March, 2008

'गोमेकॉ' : दुखणे एक, औषध भलतेच...

रक्ताने माखलेले स्ट्रेचर्स, खाटा, मळलेल्या चादरी, ओंगळवाण्या फरशी, कचऱ्याने भरून वाहणाऱ्या पेट्या, तुंबलेले संडास, पाण्याचा तुटवडा... अशा एक ना अनेक कारणांनी या इस्पितळात पाय ठेवणे मुश्कील बनले आहे. वरचेवर पुढे ढकलल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांबद्दल आता तेथे कोणालाच काही वाटेनासे झाले आहे. ही नित्याचीच बाब म्हणून त्याकडे पाहिले जाते.
गोवा आणि गोव्याशेजारच्या प्रदेशातील रुग्णांना एकेकाळी फार मोठा आधार वाटत आलेल्या ऐतिहासिक स्वरूपाच्या गोवा मेडिकल कॉलेज(गोमेकॉ)चा डोलारा आता कोसळण्याच्या बेतात आहे. आता तर उच्च न्यायालयानेच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढल्यामुळे या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्थात, आरोग्य सेवेचा हा डोलारा डगमगण्याचे कारण तेथील डॉक्टरांची अकार्यक्षमता नव्हे किवा या हॉस्पिटलवरील लोकांचा विश्र्वास उडाला हेही नव्हे, तर इस्पितळाच्या अंतर्गत कारभारात वाढत चाललेला वाढता राजकीय हस्तक्षेप हेच त्याचे एकमेव कारण आहे. त्यावर झगझगीत प्रकाश टाकणारी ही खास मालिका...

कोणत्याही इस्पितळात जी साधनसामुग्री उपलब्ध असते तिचा गरजू रुग्णांसाठी पूर्णांशाने वापर होणे अगत्याचे असते. इस्पितळाच्या प्रशासनाला तशी स्वायत्तता असणेही तेवढेच गरजेचे असते. ही राजकारणी मंडळी (काही सन्माननीय अपवाद वगळता) ज्यांच्याकडे आपल्या आमदारकीच्या अथवा मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पेलण्याचीही साधी कुवत नसते, ते अशा गोष्टी हाताळू पाहतात ज्याचे त्यांना कोणतेही ज्ञान नसते. मूळ समस्येला येथूनच प्रारंभ होतो. स्वतःच्या ज्ञानापलीकडील गोष्टींत एखाद्याचा हस्तक्षेप वाढत गेल्यावर गोंधळ माजणार नाही तर दुसरे काय? गोवा मेडिकल कॉलेज म्हणजेच "गोमेकॉ'च्या बाबतीतही तेच घडत आले आहे. १६० वर्षांची भव्य परंपरा असलेल्या आशिया खंडातील या सर्वात जुन्या मेडिकल कॉलेजने आजवर असंख्य हुशार असे डॉक्टर जगाला दिले. लाखो रुग्णांची सेवा केली. सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरलेल्या गोमेकॉची आजची स्थिती मात्र अत्यंत दयनीय झालेली आहे. जनतेची सेवा आणि गरीबांना मदत करण्याच्या नावाखाली राजकारण्यांकडून गोमेकॉचा "व्होट बॅंके'सारखा वापर होऊ लागल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. इस्पितळाची घडी सुरळीत बसवली जाते आहे, असे भासवण्यासाठी तेथे काही किरकोळ बदल करून लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातात. प्रत्यक्षात विद्यमान स्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसते. इस्पितळातील प्रत्येक विभागात मारुतीच्या शेपटीप्रमाणे हतबल रुग्णांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. मग तो रुग्णनोंदणी विभाग असो, बाह्यरूग्ण विभाग असो, रासायनिक पृथक्करण विभाग असो की कॅज्युअल्टी विभाग असो. अगदी ऑपरेशन थिएटरच्या दारातदेखील ताटकळत पडलेले रुग्ण या इस्पितळात पाहायला मिळतात. बाह्यरूग्ण विभागात तर तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आणि डॉक्टरांचे प्रमाण यात फार मोठी तफावत आहे. रुग्णांची रांग नाही असे एकही ठिकाण गोमेकॉत सापडणार नाही. प्रसूती विभागातील स्थितीचे तर वर्णन न केलेले बरे. बाळाला जन्म देण्याचे दिव्य सोडाच, तेथे गरोदर स्त्रीला तपासणारा डॉक्टर एखादीला भेटणे हेच एक मोठे दिव्य असते.
या इस्पितळाचा कारभार इतका भोंगळ बनलेला आहे की तेथील प्रशासकीय निर्णय भलत्याच व्यक्तींकडून घेतले जात आहेत. डॉक्टरांची निवड, नोकरभरती, वैद्यक सामुग्रीची खरेदी, नव्या इमारतींची उभारणी, कामाच्या निविदा काढणे, डॉक्टर- परिचारिका- अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा, औषध खरेदी आदींबाबतचे निर्णय हे त्या त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांऐवजी एक तर राजकारणी किंवा आणखी कोणामार्फत घेतले जातात. अगदी रुग्णांची देखभालदेखील राजकारण्यांच्या आदेशानुसार घेतली जाते. "अमुक एखादा रुग्ण आपला मतदार आहे, त्याला इतरांपेक्षा तातडीने चांगली सेवा पुरवा,' असे जेव्हा सुनावले जाते तेव्हा डॉक्टर त्यांच्यासमोर हात टेकतात. एका बाजूने ज्युनियर डॉक्टरांवर कामाचा बोजा वाढत चालला असताना वरिष्ठ डॉक्टर्स सत्ताधाऱ्यांचे लांगूलचालन करण्यात मग्न असतात. आरोग्यमंत्री किवा सरकारच्या काही निरर्थक सुचनांना, धोरणांना विरोध करण्याऐवजी त्यांचे समर्थन करण्यातच ही ज्येष्ठ डॉक्टरमंडळी धन्यता मानत आली आहेत. इस्पितळाच्या अंतर्गत व्यवस्थेचे एका बाजूने तीन तेरा वाजले असताना बाह्य परिसराच्या सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळले जात आहेत. भटकी गुरे आणि कुत्रे इस्पितळाच्या व्हरांड्यांत दररोज घाण करून ठेवतात. रात्री तर रुग्णांच्या नातेवाईकांना या कुत्र्यांपासून स्वतःचे रक्षण करताना नाकी नऊ येतात.
जनआरोग्याशी निगडित गोवा मेडिकल कॉलेजसारखी संस्था राजकीय हेतूने प्रेरित होऊन चालवता येणार नाही. तेथील डीन आणि सीनियर डॉक्टरांना "होयबा' बनवून कारभार हाताळण्याऐवजी त्यांचा अनुभव, त्यांच्या कौशल्याची बूज राखून त्यांच्या सूचनांचा आदर व्हायला हवा. तेथे मग वशिलेबाजी, भ्रष्टाचार आणि कोणाच्या स्वार्थाला थारा असता कामा नये. आरोग्यमंत्र्यांनी "गोमेकॉत आपल्यासाठी काय आहे' याचा विचार न करता रुग्णांना उत्तमोत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी गोमेकॉला काय हवे आहे, याचा विचार करायला हवा. आरोग्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळात गोमेकॉच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले त्यातून डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग चलबिचल झाल्यासारखे दिसते. गोमेकॉ इस्पितळ परिसरातील सरकारी मालकीची जागा बरीच इस्पितळे चालवणाऱ्या एका बिगर गोमंतकीय समूहाला दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टीवर ("लीज'वर) देण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांचा वेध घेण्यासाठी खासगी डॉक्टरांना सरकारी खर्चाने दुबईला पाठवण्यामागील कारणही समजू शकलेले नाही. काहीही निष्पन्न होत नसलेल्या अशा दौऱ्यांवरील हा खर्च म्हणजे सार्वजनिक निधीची नासाडीच होय. काही विदेशी डॉक्टरांना गोमेकॉच्या सल्लागार समितीवर नेमण्यामागील सरकारची भूमिकाही अशीच अनाकलनीय आहे. ही डॉक्टर मंडळी पंचतारांकित हॉटेलांत पार्ट्या झोडून "गोमेकॉ कसे चालवायचे..' याबद्दल "बहुमोल' सल्ला देणार आहेत. खासगी सेवेतील डॉक्टरांना एका दिवसाच्या सेवेसाठी गोमेकॉत निमंत्रित करणे, काही खासगी डॉक्टरांना कन्सलटंट म्हणून नेमून इस्पितळाच्या सेवेतील सीनियर डॉक्टरांच्या तुलनेत कितीतरी पटीने त्यांना जादा मानधन देण्याच्या कृतीमुळे सेवेतील डॉक्टर वैफल्यग्रस्त होणे स्वाभाविकच आहे. या ज्येष्ठ डॉक्टरांना इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys