Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 16 March, 2008

सरबजितला १ एप्रिलला फाशी

वाचविण्याचे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ
इस्लामाबाद, दि.१६ : गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारताचा नागरिक सरबजितसिंग याच्या फाशीचा दिवस अखेर निश्चित झाला. येत्या १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता त्याला फासावर चढविण्यात येणार आहे. लाहोरमधील लखपत तुरुंगातील अधिक्षकांना त्याच्या फाशीचा आदेश प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी सरबजितला लगेच अंधार कोठडीत टाकले.
भारताचा हेर म्हणून ठपका असलेल्या सरबजितसिंगला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने लाहोर आणि फैसलाबाद येथे १९९० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी दोषी ठरविले होते. सध्या त्याला लाहोर येथील लखपत तुरुंगात डांबण्यात आले आहे.
राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी ४ मार्च रोजी सरबजितचा दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर १४ मार्च रोजी त्याच्या फाशीचा आदेश जारी केला होता. आज तो लखपत तुरुंगाला प्राप्त झाला.
लाहोर आणि फैसलाबाद येथे १९९० मध्ये एकापाठोपाठ पाच बॉम्बस्फोट झाले होते. यात ३० जण ठार झाले होते. याप्रकरणी पाक न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. पाक सरकारच्या मते, त्याचे खरे नाव सरबजित नसून मनजितसिंग असे आहे आणि तो भारताचा हेर आहे.
तब्बल ३५ वर्षांनंतर भारतीय कैदी काश्मीरसिंगची अलीकडेच पाकच्या तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. भारतात आल्यानंतर त्याने, "मी भारताचा हेर होतो,' अशी कबुली दिली होती. त्याच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊनच पाक सरकारने सरबजितबद्दल कठोर भूमिका स्वीकारली असल्याचे मानले जात आहे. तिथेच, सरबजितच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर मुशर्रफ यांची व्यक्तिश: भेट घेऊन जर दयेचा अर्ज सादर केला तर त्याच्या फाशीला तूर्तास स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सरबजितला मनजितसिंग समजून फाशी देण्याचा पाक सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करीत नव्याने दयेचा अर्ज मुशर्रफ यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. सरबजितला मुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्वच प्रयत्न करण्यात येतील, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सरबजित हा हेर नाही. रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत तो सीमेपलीकडे गेला आणि पाकच्या पोलिसांनी त्याच्यावर हेर असल्याचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले, असा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला.

No comments: