Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 19 March, 2008

सरबजितची फाशी महिनाभर लांबणीवर

इस्लामाबाद, दि.१८: गेली १८ वर्षे पाकिस्तानातील कारागृहात खितपत असलेला भारतीय नागरिक सरबजितसिंग याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा ३० दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. त्याला १ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता फासावर टांगण्यात येणार होते. परंतु त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ३० दिवसांसाठी त्याची ही शिक्षा आता लांबणीवर टाकण्यात आली असल्याने "त्याला जीवनदान मिळेल, पाकिस्तानच्या कारागृहातून तो बाहेर येईल व मायदेशी सुरक्षित परतेल' याविषयीच्या समस्त भारतीयांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
सरबजितची फाशी ३० दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. भारत सरकारतर्फे त्याच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे अर्धे यशच आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री प्रणव मुखजीं यांनी आज लोकसभेत दिली.
दरम्यान,"सरबजितच्या सुटकेसाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू,' अशी नि:संदिग्ध ग्वाही पाकिस्तानचे मानवाधिकार मंत्री अन्सार बर्नी यांनी पुन्हा एकदा दिली असल्याने सरबजितची सुटका होण्याच्या प्रयत्नांना जोर आलेला आहे.यापूर्वी काश्मीरसिंग या भारतीय गुप्तहेराची सुटका करविण्यात व त्याला सुरक्षितपणे भारतात रवाना करण्यात अन्सार बर्नी यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. काश्मीरसिंग यांनी ३५ वर्षे पाकमध्ये शिक्षा भोगली होती.
पाकमध्ये १९९० साली झालेल्या बॉम्बहल्ल्यात सरबजितसिंगला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्याला ही शिक्षा १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता दिली जाणार होती. "सरबजितला क्षमा करावी,' याविषयीची औपचारिक विनंती भारत सरकारने काल केल्याने पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी सरबजितची फाशी ३० दिवसांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पाकच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
""सरबजितच्या क्षमादानाविषयीचे प्रकरण पाकिस्तान सरकारच्या संबंधित विभागाकडे विचाराधीन आहे. सरबजितची फाशीची शिक्षा ३० दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती भारतीय उच्चायोगाला कळविण्यात आलेली आहे,''असेही सूत्रांनी सांगितले.
""सरबजितची फाशीची शिक्षा लांबणीवर टाकण्यात आली असल्याचे भारतीय उच्चायोगाला कळविण्यात आलेले आहे. भारतीय उच्चायोगाने भारत सरकारला याविषयीची माहिती दिली. त्याच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या प्रयत्नांना यश येत असल्याचेच यामुळे सिद्ध होते. सरबजितसिंगला क्षमा केल्यास उभय देशांमधील वातावरण अधिक सौहार्दपूर्ण होण्यास मदत मिळेल,''असे प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
सरबजितची बहीण दलबिर कौर हिने काल थेट पाकचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनाच सरबजितला क्षमा करण्याची लेखी विनंती केली होती. "लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात असलेल्या आपल्या भावाला भेटण्याची परवानगी मला द्यावी,'असेही तिने या लेखी विनंतीमध्ये म्हटले होते.

पूर्ण प्रयत्न करू : बर्नी
""सरबजितला माफी दिली जावी किंवा त्याची शिक्षा कमी केली जावी, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. यासाठी कोणते मार्ग आहेत, ते आम्ही शोधून काढू. उभय देशांमधील संबंध सौहार्दपूर्ण होण्यासाठी हे काम आम्ही करू,''असे सरबजितच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे पाकचे मानवाधिकार मंत्री अन्सार बर्नी यांनी म्हटले आहे. ""सरबजितच्या कुटुंबातील सदस्यांची जर इच्छा असेल तर ते पाकिस्तानात येऊ शकतात व सरबजितच्या निर्दोष असण्यासंबंधीचे दस्तावेज सादर करू शकतात,''असेही बर्नी म्हणाले. पुढील आठवड्यात आपण भारताच्या दौऱ्यावर येत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

No comments: