Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 4 April, 2011

पणजीतील भाषा मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित रहा

शशिकला काकोडकर यांचे आवाहन
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): पालकांनी आपल्या हातातील सर्व कामे बाजूला ठेवून येत्या दि. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मोठ्या संख्येने भारतीय भाषांच्या रक्षणासाठी पणजीच्या आझाद मैदानावर एकत्रित व्हावे, असे आवाहन आज भारतीय सुरक्षा मंचाच्या अध्यक्षा तथा माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी आज (दि.३) केले. आज सकाळी त्या राज्यातील मराठी तसेच कोकणी साहित्यिकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या. तसेच या मेळाव्यास २५ हजार लोक उपस्थित राहतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
सिद्धार्थ भवनमध्ये घेतलेल्या या बैठकीत मराठी व कोकणी साहित्यातील दुवा कायम राहावा यासाठी किमान वर्षातून एकदा दोन्ही भाषांचे साहित्य संमेलन घडवून आणण्याचा विचार व्यक्त यावेळी करण्यात आला. काही हेवेदावे असले तरी एकमेकांच्या भाषेबद्दल कोणालाही द्वेष नाही, असाही सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत, एन. शिवदास, प्रा. अनिल सामंत, प्रा. प्रकाश पर्येकर, बाळ सप्रे, परेश प्रभू यांनी सहभाग घेतला. तर, अन्य साहित्यिकांनी आपल्या सूचनाही यावेळी केल्या.
पूर्व प्राथमिक स्तरावर इंग्रजी विषय सक्तीचा केल्यास शेकडो पूर्व प्राथमिक तसेच प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या शिक्षकांनीही या महामेळाव्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी मंचातर्फे करण्यात आले.
दरम्यान, आज सायंकाळी मंचाच्या अध्यक्षा श्रीमती काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. राहिलेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी प्रवास करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले आहे. तसेच, ग्रामस्तरावर ८० बैठका घेण्यात आल्या असून आत्तापर्यंत या बैठकांतून सुमारे साडेआठ हजार लोकांपर्यंत हा विषय नेण्यात यश आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकांत सहभागी झालेले साडेआठ हजार लोक भारतीय भाषेच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या महामेळाव्यात २५ हजार लोकांना घेऊन येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

No comments: