Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 8 April, 2011

आमच्या हक्कांवर गदा का?

दयानंद नार्वेकरांची सभापतींकडे पृच्छा

पणजी, दि. ७ (विशेष प्रतिनिधी)
‘सभापती महोदय, गेले दोन दिवस सभागृहात गोंधळ सुरू आहे. गदारोळात दिवसाचे कामकाज जरी आटोपण्यात आले तरी आम्हाला सभागृहात आमचे म्हणणे मांडायचा अवसरच मिळाला नाही. लोकशाही तत्त्वानुसार विरोधकांनी एखाद्या गंभीर प्रकरणात सभागृहात चर्चेची मागणी करणे हे वावगे नाही. तो त्यांचा घटनादत्त अधिकारच आहे. तथापि, गोंधळामुळे आमचा बोलण्याचा हक्कच हिरावला गेला आहे. सरकारही विरोधकांच्या मागणीबाबत ढिम्मच राहिल्याने आमचा हिरावलेला हक्क मिळवून देण्यासाठी सभापतींनी यात हस्तक्षेप करण्याची हीच योग्य वेळ आहे’, असे आवाहन सत्ताधारी पक्षाचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी आज विधानसभेत आपल्या एका हरकतीच्या मुद्यावर बोलताना मांडले.
गेले दोन दिवस आम्ही विधानसभेत येत आहोत. सरकारचे कितीतरी अधिकारी येतात. मात्र एका मंत्र्यामुळे विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला आहे. विरोधी पक्षाची भूमिका अयोग्य आहे असे मी म्हणणार नाही. घटनेने तो अधिकारच त्यांना दिला आहे. मात्र विधानसभा कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जाऊ नये यासाठी सभापतींनी त्यांना लाभलेल्या विशेषाधिकारांचा वापर करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
एक मंत्री म्हणजे सारा गोवा नव्हे. आमच्या अन्य मंत्री व सरकारविरुद्धही अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्या मांडणे व मतदारसंघातील ज्या जनतेने आम्हाला निवडून दिले त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे. तथापि, ते पार पाडायचे तर विधानसभेचे कामकाज सुरळीत चालले पाहिजे. सभागृहाचे कामकाज सुरळीत कसे होईल हे पाहण्याची जबाबदारी सभापती व सरकारची आहे, असे त्यांनी नमूद केले.
याआधी जेव्हा मुख्यमंत्र्यांना नको असेल तेव्हा त्यांनी कित्येक मंत्र्यांना अलगद बाजूला केले आहे, असेही नार्वेकर म्हणाले. अर्थात, यावेळी त्यांचा रोख स्वतःला गमवाव्या लागलेल्या मंत्रिपदावर होता. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी ती कारवाई केली होती. त्यामुळे, यावेळी मात्र मुख्यमंत्री गप्प का, अशी विचारणा नार्वेकरांनी केली.
सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवणे तुम्हाला शक्य आहे. मुख्यमंत्रीही यात लक्ष घालू शकतात. मात्र तसे न होऊ देता सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घेणे योग्य नव्हे. त्यामुळे माझ्या हक्कांवर आलेली गदा दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे, असे कळकळीचे आवाहन नार्वेकरांनी सभापतींना केले. विधानसभा सुरळीत चालत नाही याचा आपल्याला खेद होतो, असेही नार्वेकर म्हणाले.
सभागृहात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नाही हे सांगताना नार्वेकरांनी ‘रिव्हर प्रिन्सेस’ जहाजाचे भंगार मांडवी नदीत बिठ्ठोणच्या बाजूने कापण्याच्या सुरू असलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. दोन दिवसांआधीच सरकारने तिथे भंगार कापले जाणार नसल्याचे सांगितले होते याकडेही नार्वेकर यांनी अंगुलिनिर्देश केला.

No comments: