Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 20 January, 2011

अखेर जीतेंद्र देशप्रभूंना खाण खात्याचा दणका

कोरगावातील बेकायदा खाणीवरून १ कोटी ७२ लाख रुपयांचा दंड

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
भाईडवाडा - कोरगाव येथे सर्वे क्रमांक २९९/० अंतर्गत सुरू असलेल्या बेकायदा खाणीविरोधात स्थानिकांनी तसेच विरोधी पक्षाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर खाण खात्याला आक्रमक पवित्रा घेणे भाग पडले आहे. याचाच परिपाक म्हणून खाण खात्याने या जमिनीचे मालक तथा पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांना तब्बल १ कोटी ७२ लाख २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड सात दिवसांत अदा केला नाही तर ही रक्कम महसुली थकबाकी म्हणून वसूल केली जाईल, अशी सक्त ताकीदही देण्यात आली आहे.
पेडणे तालुक्यातील कोरगाव गावात सुरू असलेल्या या बेकायदा खाणीचा विषय गेली कित्येक वर्षे गाजतो आहे. पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी या विषयावरून सातत्याने विधानसभेत आवाज उठवला होता. आंब्याची लागवड करण्याच्या निमित्ताने स्थानिक पंचायतीकडून ना हरकत दाखला घेऊन इथे छुप्या पद्धतीने खनिज उत्खनन होत असल्याचा आरोप आमदार सोपटे यांनी केला होता. याच विषयावरून येथील स्थानिकांनी खनिज वाहतूक रोखून धरली होती व त्यांच्या विरोधात पोलिस तक्रारही नोंद करण्यात आली आहे. खाण खात्याच्या अधिकार्‍यांनी २८ ऑगस्ट २०१० रोजी या ठिकाणी पाहणी केली असता तिथे खरोखरच बेकायदा खाण सुरू असल्याचे उघड झाले. या ठिकाणी १५ हजार मेट्रिक टन लोह खनिज साठवून ठेवले आहे व सुमारे ५०६ फेर्‍या मारून खनिजाची वाहतूकही करण्यात आली आहे. खाण खात्याने नावेली येथे छापा टाकून हे बेकायदा खनिज जप्त केल्याचीही माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१० रोजी खाण खात्यातर्फे जितेंद्र देशप्रभू यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली व त्यावर १३ सप्टेंबर २०१० रोजी त्यांनी खुलासा केलेला असला तरी खात्याने तो फेटाळला आहे. त्यानंतर १३ डिसेंबर २०१० रोजी नोटीस जारी करून त्यांना ५२३६० मेट्रिक टन बेकायदा खनिज उत्खनन केल्याप्रकरणी १,७२,२५,६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या घटनेला आता एक महिना उलटला तरी अद्याप हा दंड अदा करण्यात आलेला नाही, अशी माहिती खाण खात्यातील सूत्रांनी दिली.
प्रत्यक्ष खाणीच्या ठिकाणी जोरात काम सुरू आहे. ही जागा खाजगी असल्याने तिथे प्रवेश करून विरोध करणे स्थानिकांना शक्य नाही. स्थानिकांना संबंधितांकडून पोलिसांचा धाक दाखवला जातो, अशीही खबर आहे. सध्या खनिज वाहतूक बंद असल्याने लोक गप्प आहेत. मात्र एकदा का ही खनिज वाहतूक सुरू झाली की पुन्हा एकदा हा विषय उफाळून येण्याची शक्यता आहे. अलीकडेच पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांची जाहीर सभा या ठिकाणी झाली व त्याला स्थानिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

No comments: