Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 22 January, 2011

सुबदळेवासीयांना जिवंतपणी नरकवास!

सरकारच्या बेपर्वाईमुळे गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
- फिशमिलच्या एक मैल परिसरात किड्यांचा थर
- गावात निळ्या रंगांच्या मोठ्या माशांची पैदास
- असह्य दुर्गंधीमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील

कुंकळ्ळी, दि. २१ (प्रतिनिधी): केपे तालुक्यातील सुबदळे येथील कोंडीमळस्थित एका फिशमिलमुळे सुबदळेवासीय सध्या जिवंतपणी नरकवास भोगावा लागत आहे. इथे वाळत घातलेल्या कुजक्या मासळीच्या असह्य दुर्गंधीमुळे नागरिकांना आपल्या घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. गावात पैदा झालेल्या निळ्या रंगांच्या मोठ्या माशांमुळे आणि फिशमिलच्या एका मैलाच्या परिसरात एक इंच जाडीच्या जिवंत किड्यांचा थर साचल्यामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून गावकरी या फिशमिलच्या विरोधात सरकारदरबारी झगडत असून या काळात संबंधित अधिकार्‍यांकडून मिलवर कोणतीही कारवाई न झाल्याने ते आता निर्णायक लढ्याच्या पवित्र्यात उभे ठाकले आहेत. आज सुमारे दोनशे नागरिकांच्या गटाने या फिशमिलवर मोर्चा वळवला होता. येथील नागरिकांनी १९ जानेवारी रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, मडगाव - केपे मामलेदार कार्यालय, बाळ्ळी पंचायत, बाळ्ळी आरोग्यकेंद्र व संबंधित मंत्री, आमदारांना निवेदन सादर करून या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने बाळ्ळी आरोग्यकेंद्राच्या अधिकार्‍यांनी पणजी आरोग्यकेंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र नाडकर्णी यांच्यासमवेत सदर फिशमिल परिसराची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. यावेळी सेनीटरी निरीक्षक जयकुमार नाईकही उपस्थित होते.
यावेळी गावकर्‍यांतर्फे कैफियत मांडताना कुशावती वेळीप म्हणाल्या की, इथे वाळत घातलेल्या कुजक्या मासळीमुळे गावात असह्य दुर्गंधी पसरली असून अन्न ग्रहण करणेही कठीण झाले आहे. गावात फैलावलेल्या मोठाल्या निळ्या माशा अन्नावर येऊन बसतात व त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. ही कुजकी मासळी कावळे गावातील झरी, ओहोळ यांमध्ये आणून टाकत असल्याने येथील पिण्याचे पाणीही प्रदूषित झाले आहे. पक्षांनी घराजवळ आणून टाकलेल्या मासळीतून बाहेर येणारे किडे आमच्या घरादारांत पसरले आहेत, अशी कैफियत मायावती वेळीप यांनी मांडली. गावातील महादेव मंदिराच्या कौलावरही कुजकी मासळी पडलेली असल्याने गावकर्‍यांच्या श्रद्धेला मोठाच धक्का बसत असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी सरकारदरबारी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी केलेले व जमावाचे नेतृत्व करणारे लक्ष्मण वेळीप यांनी सांगितले की, गेली तीन वर्षे आम्ही या समस्येवरून सरकारचे उंबरठे झिजवत आहोत. सर्व संबंधितांना याप्रकरणी निवेदने सादर करूनही या फिशमिलवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता गावकर्‍यांचा संयम सुटत चालला असून येत्या आठ दिवसांत जर या मिलवर कारवाई झाली नाही तर येथे येणारे कुजक्या मासळीचे ट्रक रोखून धरले जातील आणि त्यानंतर उद्भवणार्‍या प्रसंगाला सरकारच जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. १९९३ साली जेव्हा ही फिशमिल सुरू झाली तेव्हा तेव्हा तिला बाहेरून वाळवून आणलेल्या मासळीची पावडर करण्याचीच परवानगी होती. मात्र आता येथेच कुजकी मासळी आणून वाळवली जात असल्याने हा गाव म्हणजे साक्षात नरक बनला आहे, अशी वेदनाही त्यांनी बोलून दाखवली. पावसाळ्यात तर येथील परिस्थिती अतिशय भयानक असते अशी माहिती संतोष गावकर यांनी दिली. पावसाळ्यात या फिशमिलच्या आवारातील सर्व घाण गावातील रस्त्यांवरून वाहत असते व सर्वत्र दुर्गंधीमय वातावरण पसरते असे त्यांनी सांगितले.
यावेळी बाळ्ळी आरोग्यकेंद्राच्या अधिकारी डॉ. पूनम वेरेकर म्हणाल्या की, गावकर्‍यांनी या फिशमिलसंदर्भात वेळोवेळी तक्रारी केल्या असून आम्ही पाहणी करून वरिष्ठांना अहवालही सादर केले आहेत. मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार आम्हांला नसून तो प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा स्थानिक पंचायतीला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी बाळ्ळी पंचायतीचे सरपंच गोकुळदास गावकर यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.

No comments: