Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 21 January, 2011

‘गोमेकॉ’तून आता वैद्यकीय अहवालही फुटायला लागले

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): ‘एमबीबीएस’ पेपर फुटल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळातून ‘वैद्यकीय अहवाल’ही फुटायला लागल्याने या इस्पितळाचे प्रशासनच साफ कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीला सादर होण्यापूर्वीच मयत सिप्रियानो फर्नांडिस याचा वैद्यकीय अहवाल प्रसिद्धी माध्यमांच्या हाती लागल्याने उलट सुलट चर्चेला तोंड फुटले आहे.
दरम्यान, सिप्रियानोचा वैद्यकीय अहवाल एका इंग्रजी वर्तमानपत्राने स्वतःला हवा तसा अर्थ लावून आधीच प्रसिद्ध केल्याने त्याच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, हा अहवाल चौकशी अधिकार्‍यांना देण्यापूर्वीच प्रसिद्धी माध्यमांना पुरवणार्‍या ‘त्या’ डॉक्टरांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी करणारे उपअधीक्षक बोसुएट सिल्वा हे उद्या आपला अहवाल सादर करणार आहेत.
सिप्रियानो याला विभागीय उप न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर न करताच पोलिसांनी जामीन घेतल्याचेही उघड झाले आहे. सिप्रियानो हा बेशुद्ध झाल्यानंतर त्याला इस्पितळात सोडून पोलिसांनी थेट उप न्यायदंडाधिकार्‍यांसमोर येऊन सिप्रियानो याला जामीन मिळवून घेतला. याची पुष्टी खुद्द साबाजी शेटये यांनी केली आहे. सिप्रियानो याला आपल्यासमोर हजर करण्यात आले नव्हते, असे श्री. शेटये यांनी सांगितले असल्याने पणजी पोलिस गोत्यात आले आहेत. सिप्रियानो याला ताळगाव येथे मारहाण झाली होती अशी भूमिका घेणार्‍या पोलिसांनी ही मारहाण करणार्‍यांना अद्याप अटक का केली नाही, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सिप्रियानो याला मोठ्या चामडी पट्ट्याने पोलिसांनी मारहाण केली होती अशी माहिती खुद्द या प्रकरणातील तक्रारदार महिलेनेच दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची खात्याअंतर्गत आणि उप न्यायदंडाधिकार्‍यांकडून चौकशी सुरू असताना पणजी पोलिस सिप्रियानोच्या नातेवाइकांना चौकशीसाठी बोलावत असल्याची माहिती ‘ऊठ गोयकारा’ या संघटनेच्या एका पदाधिकार्‍याने दिली.

No comments: