Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 18 January, 2011

पोलिस - ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणी गृहमंत्र्यांचीच चौकशी करा

मिकी पाशेको यांची जोरदार मागणी

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)
गोव्यात ड्रगची भानगडच नाही, असा दावा गृहमंत्र्यांकडून केला जातो आणि दुसरीकडे पोलिस व ड्रग माफियांचे साटेलोटे असल्याची मालिकाच उघड होत चालली आहे. त्यामुळे या प्रकरणी गृहमंत्र्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी बाणावलीचे आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांनी केली.
कॅसिनो प्रकरणी पोलिसांनी आजच आरोपपत्र दाखल केलेल्या मिकी पाशेको यांनी आपण या प्रकरणांतून सहीसलामत बाहेर पडू, असा विश्‍वासही व्यक्त केला. आज येथे बोलावलेल्या पत्रपरिषदेत मिकी पाशेको यांनी गृहमंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना चांगलेच फैलावर घेतले.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना मुकाट्याने याकडे पाहणारे मुख्यमंत्री कामत तेवढेच जबाबदार ठरतात, असा ठपकाही त्यांनी ठेवला. भाजप सरकारात दिगंबर कामत मंत्री होते तेव्हा त्यांच्या मेव्हण्याला साधी थप्पड लावली म्हणून तत्कालीन उपअधीक्षक शिरीष थोरात यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र मयडे येथील सिप्रियानो फर्नांडिस मृत्युप्रकरणी पोलिसांविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री आता त्याच पोलिसांवर कारवाई करण्यास कचरतात का, असा खडा सवाल पाशेको यांनी केला. ड्रग व्यवहार प्रकरणांत अलीकडेच सापडलेले पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर यांना अजूनही का अटक होत नाही? या प्रकरणाचे धागेदोरे स्वतःच्या दारांपर्यंत पोहचतील अशी धास्ती या मंडळींना वाटते काय, असा टोलाही मिकी यांनी लगावला.
आपल्याला अटक झाल्यानंतर लगेच ‘सीबीआय’ने स्वेच्छा दखल घेऊन आपल्या बंगल्यावर छापे टाकले. मात्र सध्या गाजत असलेल्या ड्रगप्रकरणाची स्वेच्छा दखल घेण्याची गरज कोणत्याही तपास संस्थेला का वाटत नाही? या संपूर्ण व्यवहारांचे हप्ते सर्वांपर्यंत पोहचवले जातात की काय, असा संशय त्यांनी बोलून दाखवला.
माझ्यावर आरोपपत्र दाखल झाल्याचे कारण सांगून माझ्या मंत्रिमंडळ समावेशास विरोध करणार्‍या मुख्यमंत्र्यांना सरकारच्या प्रतिमेची एवढीच काळजी असती तर ड्रग प्रकरणावरून त्यांनी एव्हाना विद्यमान गृहमंत्र्यांना यांना डच्चूच दिला असता, असे मिकी म्हणाले.
दरम्यान, सभापती प्रतापसिंग राणे यांनी पाठवलेल्या नोटिशीबाबत विचारले असता २४ रोजी आपण बाहेरगावी जाणार असल्याने सभापतींसमोर हजर राहणे आपणास शक्य नाही,असे ते म्हणाले. मुळात पक्षाचा विधिमंडळ नेता व मुख्य प्रतोद ठरवण्याचा अधिकार पक्षाला आहे. याबाबत पक्षाने आपला निर्णय सभापतींना कळवला आहे. त्यामुळे या प्रकरणी नोटिसा पाठवून सुनावणी घेण्याची गरज का वाटावी, असा सवाल त्यांनी केला.
कॉंग्रेसकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची हेटाळणी होत असून हे आघाडीच्या धर्माचे उल्लंघन आहे, असा आरोप प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट यांनी केला; तर पोलिस व ड्रग माफिया साटेलोटे उघड झाले असताना आता या पोलिसांना कुणाचे अभय आहे त्या राजकारण्यांचेही बिंग फुटले पाहिजे, असे प्रवक्ते अविनाश भोसले म्हणाले. याप्रसंगी संगीता परब, डॉ. कार्मो पेगादो, प्रकाश फडते, व्यंकटेश प्रभू मोनी, राजन घाटे आदी पदाधिकारी हजर होते.

No comments: