Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 22 January, 2011

मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिस तक्रार

‘इको टुरिझम’वरून पिळर्ण नागरिक मंच आक्रमक
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): प्रादेशिक आराखडा २०२१मध्ये बेकायदेशीररीत्या ‘इको टुरिझम’चा समावेश केल्याने राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह अन्य आठ जणांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज दुपारी पिळर्ण नागरिक मंचाच्या वतीने ५० सामाजिक संस्थांनी ही तक्रार केली आहे.
या तक्रारीत प्रादेशिक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवर खोटारडेपणा, फसवणुकीचा आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह नगर नियोजन खात्याचे सचिव टी. एन. बाळकृष्णन, भारतीय अर्किटेक्चर संस्थेचे अध्यक्ष ब्रायन सुवारीस, वरिष्ठ नगर नियोजक पुत्तूराजू, पंचायत संचालनालयाचे संचालक मिनीन डिसोझा, या समितीचे सदस्य पद्मविभूषण पुरस्कार विजेते चार्ल्स कुरिया, भरारी पथकाचे कार्यकारी सदस्य राहुल देशपांडे व डीन डिक्रूज, उद्योग संचालनालयाचे संचालक संजीत रॉड्रिगीस, पालिका प्रशासनाचे संचालक डी. ए. हवालदार व मुख्य नगर नियोजक तथा समितीचे निमंत्रक मुराद अहमद यांच्या विरुद्धही ही तक्रार करण्यात आली आहे.
पेडणे आणि काणकोणसाठी अधिसूचित करण्यात आलेला हा प्रादेशिक आराखडा त्वरित रद्द करण्याचाही मागणी यावेळी पिळर्ण नागरिक मंचाने केली. जसा ‘सेझ’ रद्द करण्यात आला तसाच अधिसूचित करण्यात आलेला पेडणे आणि कोणकोण प्रादेशिक आराखडाही रद्द करता येईल असे सांगून हा आराखडा रद्द न झाल्यास सर्व शक्तीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा यावेळी यतीन नाईक यांनी दिला.
मुख्यमंत्री कामत आणि त्यांच्या समितीने ‘इको टुरिझम’साठी प्रादेशिक आराखड्यात राखीव ठेवण्यात आलेली जागा यापूर्वीच काही बिल्डरांना विकली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दिल्ली येथील काही रिअल इस्टेटवाल्यांनी ही जागा विकत घेतली असल्याचा दावा यावेळी फा. बिस्मार्क डायस यांनी केला. हे इको टुरिझम क्षेत्र अशा पद्धतीने राखीव ठेवण्यात आले आहे की, त्याचा फायदा केवळ हॉटेल उद्योजकांनाच होणार आहे. राखीव ठेवलेली जागा हॉटेल बांधकाम करणार्‍या कंपन्यांनी विकत घेतली असल्याचे यावेळी पिळर्ण नागरिक मंचाचे निमंत्रक ऍड. यतीन नाईक यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कामत हे जनतेची फसवणूक करीत आहेत. त्यांच्याकडून मिळणारी सर्व माहिती ही खोटी असते, असा धडधडीत आरोप मंचाचे अध्यक्ष प्रकाश बांदोडकर यांनी केला. दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून त्यांनी या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

No comments: