Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 4 July, 2010

फोंडा अपघातात युवक मृत्युमुखी

फोंडा, दि.३ (प्रतिनिधी): केरये कुर्टी येथे आज (दि.३) दुपारी टाटा ट्रेलर ट्रकने (आरजे १९ जीबी २६९९) समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक ठार झाला असून मोटर सायकलवर मागे बसलेला गंभीर जखमी झाला आहे. रमेश बसप्पा सनगर (२४ वर्षे) रा. तिस्क उसगाव असे ठार झालेल्याचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकातील रहिवासी आहे.
लक्ष्मण भीमप्पा हसीमणी (तिस्क) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर बांबोळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, टाटा ट्रेलर ट्रक उसगाव येथून फोंड्याला जात असताना केरये कुर्टी येथील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चालकाने ट्रकचा ब्रेक दाबला. पावसामुळे रस्ता निसरडा बनलेला होता. त्यामुळे ट्रक रस्त्यावर घसरून त्याची दिशा बदलून गेली. यावेळी फोंड्यातून उसगावला जाणाऱ्या मोटरसायकलला (जीए ०५ सी ०१४५) जोरदार धडक बसली. त्यानंतर ट्रकाने रस्त्याच्या बाजूला घळीला धडक बसली आणि मोटरसायकल ट्रकच्या मागील बाजूला सापडून मातीत गाडली गेली.
या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघाताचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक निखिल पालेकर, हवालदार अच्युत गावस यांनी केला आहे.

No comments: