Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 February, 2010

कुळे ग्रामसभा : तणावाची शक्यता

खनिजप्रश्नी कुळे ग्रामसभेत
गदारोळ होण्याची शक्यता

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): भर कुळे बाजारातून खनिज मालाची वाहतूक करण्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून काही आपमतलबी व्यक्तींनी कुळेत पुन्हा एकदा खनिज वाहतूक सुरू करण्याची जोरदार तयारी चालवली असून येत्या ग्रामसभेत या विषयावरून मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही ग्रामसभा घेण्याचे ठरवण्यात आले असून त्यात रेल्वे यार्डात खनिज मालाचा चढ उतार करण्याचा ठराव मांडण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे कुळेवासीयांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला असून ग्रामसभेपुढील सदर विषय त्वरित रद्द करावा, अशी जोरदार मागणी कुळे नागरिक समितीने केली आहे. त्याचप्रमाणे, ही खनिज वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास कुळे बाजार ओस पडून पर्यटन व्यवसायावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सध्या दूधसागर या पर्यटनस्थळी जाण्यासाठी कुळे गावात आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने येथील तरुणांना व्यवसायाचे नवे क्षेत्र निर्माण झाले आहे. खनिज व्यवसायामुळे या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्यास अनेक तरुण बेरोजगार होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. खनिज वाहतूक सुरू करू पाहणाऱ्या लोकांनी काही पंच सदस्यांना हाताशी धरून हा ठराव संमत करण्याचा डाव आखला आहे. मात्र, त्याला जोरदार विरोध करण्यासाठी नागरिक समितीनेही कंबर कसली आहे. जोपर्यंत कुळे रेल्वे यार्डमधून बगल रस्ता होत नाही, तोवर येथून खनिज वाहतूक करण्यास विरोध केला जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
दि. १५ नोव्हेंबर २००९ मध्ये दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्वांसमक्ष खनिज वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला होता. रेल्वे यार्डात उतरवल्या जाणाऱ्या खनिज मालाची वाहतूक बगल रस्त्यातून केली जावी, यावर सगळ्यांचे एकमत झाले होते. या बैठकीत स्थानिक ठेकेदार, पालक शिक्षक संघ, पंचायत मंडळ, नागरिक समिती तसेच ही खनिज वाहतूक सुरू करू पाहणारे खनिज कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यावेळी या तोडग्याला सर्वांनी होकार दर्शविला होता. परंतु, आता मात्र त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धाब्यावर बसवून थेट बाजारातूनच खनिज वाहतूक करण्याचा घाट या लोकांनी घातला आहे, असा आरोप नागरिक समितीने केला आहे. हे लोक ग्रामस्थांच्या भावनांना किंमत देत नाहीत ते सोडाच; आता जिल्हाधिकाऱ्यांच्याही आदेशाला धाब्यावर बसवत असल्याची टीका समितीने केली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीत कुळे पंचायतीचे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सदर प्रकरणामुळे या दोन्ही उमेदवारांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना खनिज माल हाताळणीसारखा विषय ग्रामसभेत घेतला जाऊ शकतो का, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments: