Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 20 February, 2010

विदेशींच्या दादागिरीविरोधात मोरजीवासीय एकवटले

२१ रोजी ग्रामसभा गाजणार
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील किनारी भागांत खास करून मोरजी गावात विदेशी नागरिकांच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय मोरजीवासियांनी घेतला आहे. आत्तापर्यंत या दादागिरीबाबत स्थानिकांनी सामंजस्य भूमिका घेतली, पण रोहीदास शेटगांवकर या टॅक्सी चालकावर हल्ला चढवून त्याचा जीव घेण्यापर्यंत या लोकांची मजल पोहचल्याने स्थानिक युवकांनीही आता विदेशींना आपला हिसका दाखवण्याची जय्यत तयारी चालवली आहे. परवा २१ रोजी मोरजी पंचायतीची ग्रामसभा होणार असून त्यावेळी याविषयावरून गरमागरम चर्चा होणार आहे.
मोरजी गावात मोठ्या प्रमाणात विदेशी लोकांची वर्दळ वाढली आहे. विशेष करून रशियन लोकांनी या गावच्या किनारी भागावर पूर्णपणे आपले वर्चस्व मिळवल्याने मोरजी किनाऱ्यावर जाण्यासाठी शोधून वाट सापडत नाही,अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील काही स्थानिक शॅक्स मालकांनी पर्यटन खात्याकडून मिळवलेला हा पारंपरिक व्यवसाय रशियन लोकांना चालवण्यासाठी दिल्याने या व्यवसायावरही त्यांनी कब्जा मिळवला आहे. मोरजी गावातील स्थानिक युवकांना टॅक्सी व्यवसाय व इतर बारीक सारीक रोजगार प्राप्त झाल्याने त्यांच्याकडूनही आत्तापर्यंत विदेशी नागरिकांच्या मुजोरपणाकडे कानाडोळा केला. आता मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असून या विदेशी नागरिकांकडून थेट स्थानिकांना आव्हान देण्याचेच प्रकार सुरू झाले आहेत. पोलिस व इतर प्रशासकीय यंत्रणेला पैशांच्या जोरावर विकत घेऊन हे लोक स्थानिकांचीच सतावणूक करीत असल्याने मोरजी गावातील काही स्थानिक युवकांनी हा विषय गंभीरपणे घेतला आहे.
येत्या २१ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत विदेशी नागरिकांच्या वाढत्या कारवायांबाबत गरमागरम चर्चा होणार आहे. मोरजीचे सरपंच रत्नाकर शेटगांवकर यांनी विदेशी नागरिकांना शॅक्स चालवण्यास विरोध करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.मोरजीचो एकवट संघटनेचे नेते वसंत शेटगांवकर यांनीही हा विषय गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रोहीदास शेटगांवकर याच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळवून देण्याबाबतही ग्रामपंचायतीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, इथे विदेशी नागरिकांना त्रास दिल्यास रोजगाराला मुकावे लागेल,अशी भिती पसरवली जात आहे. मोरजी गावात अनेक युवक टॅक्सी व्यवसायात आहेत, त्यामुळे पर्यटनाला झळ पोहचल्यास व्यवसायावर परिणाम होईल,असाही धोका दाखवला जात आहे. मोरजीत पर्यटकांना येण्यास कुणाचाही विरोध नाही पण इथे वास्तव्य करून व व्यवसाय करून स्थानिकांनाच दादागिरी दाखवणे हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. मोरजीवासिय जेवढे शांत तेवढेच आक्रमकही आहेत व तशी वेळ आली तर मोरजीवासिय आपला इंगा दाखवण्यास अजिबात मागे राहणार नाहीत,असा इशाराही काही स्थानिक युवकांनी दिला आहे.

No comments: