Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 18 February, 2010

हरिप्रसाद-राणे भेटीमुळे नेतृत्व बदलाला पुन्हा जोर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस पक्षांतर्गत बंडखोर गटाने नेतृत्व बदलाच्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे व त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींचीही पंचाईत झाली आहे. काल संध्याकाळी अचानकपणे गोवा भेटीवर आलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. आज सकाळी त्यांनी खुद्द सभापती प्रतापसिंग राणे यांच्या आल्तिनो बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली व सुमारे पंधरा ते वीस मिनिटे प्रदीर्घ चर्चा केली. हरिप्रसाद दुपारी दिल्लीला रवाना झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग प्राप्त झाला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद हे काल संध्याकाळी अचानक गोव्यात दाखल झाले. त्यांच्या या भेटीबाबत पक्षाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. काल ते थेट दोनापावला येथील एका हॉटेलात दाखल झाल्यानंतर तिथे त्यांनी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यात प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, आमदार आग्नेल फर्नांडिस आदींचा समावेश होता. बंडखोर गटाने नेतृत्व बदलावरून पक्षश्रेष्ठींना ठरावीक मुदत दिली होती व त्यामुळेच या विषयावर चर्चा करण्यासाठी हरिप्रसाद दाखल झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेअंतीही बंडखोरांनी आपली मागणी कायम ठेवली आहे, अशीही खबर आहे.
बंडखोर गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी सभापती प्रतापसिंग राणे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राणे यांनीही यावेळी उघडपणे नकार न देता पक्षश्रेष्ठींचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सूचित केले होते व त्यामुळे पक्षश्रेष्ठींही अडचणीत सापडले आहेत. आज दुपारी हरिप्रसाद यांनी स्वतःहून प्रतापसिंग राणे यांची त्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर भेट घेतली व त्यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली. या चर्चेत नेमके काय ठरले, हे जरी सांगण्यास त्यांनी नकार दिला असता तरी नेतृत्व बदलाचा अजिबात विचार नाही व तो विषयच नाही, असे सांगून हरिप्रसाद यांनी पुन्हा एकदा या विषयावर पडदा टाकला आहे. येत्या आठवड्यात याप्रकरणी पक्षश्रेष्ठींची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होणार असल्याने अनेक नेते त्याकडे लक्ष ठेवून आहेत.

No comments: