Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 16 February, 2010

भामईत खनिज वाहतूक रोखली

दळवी विद्यालयाचे विद्यार्थी व पालक शेवटी रस्त्यावर उतरले
ट्रक मालकांकडून महिलांना धक्काबुक्कीचा प्रयत्न.
पोलिस आले... पण आंदोलन संपल्यानंतर!
मामलेदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.

तिस्क उसगाव, दि. १५ (प्रतिनिधी): खनिज मातीच्या वाहतुकीमुळे होत असलेल्या धूळ प्रदूषणाने त्रस्त झालेल्या भामई - पाळी येथील श्रीमती ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आज सकाळी विद्यालयासमोर क्षमतेपेक्षा अधिक खनिज मालाची वाहतूक करणारे टिपर ट्रक रोखून धरले. त्यांनी शांततेच्या मार्गाने सुरू केलेले हे "रास्ता रोको' आंदोलन टिपर ट्रक मालकांनी उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला व पालकवर्गात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांशी बाचाबाची करून त्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी सर्व प्रकारची वाहतूक रोखून धरून वाहतूक कोंडी केली. यावेळी पालकांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे रस्त्यावर हे सर्व महाभारत घडत असताना अनुचित प्रकार रोखण्यासाठी शेवटपर्यंत डिचोली किंवा पणजीहून पोलिस फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला नाही; तर उपस्थित भामई पोलिस चौकीच्या तीन पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. दुपारी आंदोलन मागे घेतल्यानंतर डिचोली पोलिस भामई - पाळी येथे दाखल झाले.
या भागात खनिज मालाच्या अनिर्बंध वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या व यासंबंधी संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही आजपर्यंत पदरी निराशाच पडलेल्या श्रीमती ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या पालक व विद्यार्थ्यांनी शेवटी आपला आवाज संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे ठरवले. त्यानुसार आज सकाळी ९ वाजल्यापासून त्यांनी खनिज मालवाहू टिपर ट्रक रोखून धरले.
"खनिज मातीच्या वाहतुकीमुळे निर्माण होत असलेल्या धूळ प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढा; सदर विद्यालयाच्या परिसरात रोज साचत असलेली खनिज मातीची धूळ दररोज झाडून काढली पाहिजे; तसेच पाण्याचा फवारा मारून रस्ता स्वच्छ करायला हवा; विद्यालय परिसरातून टिपर ट्रक सावकाशीने हाकले गेले पाहिजेत. रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे; विद्यालय परिसरात टिपर ट्रकांच्या कर्कश हॉर्नमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भग्न होते, त्यामुळे विद्यालय परिसरात हॉर्न वाजविण्यावर बंदी घालायला हवी; विद्यालयासमोरील रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली गेली पाहिजे', अशा स्वरूपाच्या मागण्या आज पालकांनी केल्या. धूळ प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला असून ते वारंवार आजारी पडू लागले आहेत, अशी पालकांची चिंतावजा तक्रार होती.
त्यावेळी भामई भागातील तीन ट्रक मालकांनी पालकांशी भांडण उरकून काढले व पालकवर्गातील महिलांना धक्काबुक्की करण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. ट्रक मालकांनी रस्त्यावरून होत असलेली सर्वच वाहतूक अडवून धरली. त्यामुळे इथे वाहतूक कोंडी झाली.
वातावरण तापत असलेले पाहून शेवटी स्थानिकांनी दूरध्वनीवरून फोंडा, पणजी व डिचोली पोलिसांशी संपर्क साधला आणि भामई येथे सुरू असलेल्या "रास्ता रोको' आंदोलनाची व व पालक व ट्रक मालक यांच्यातील संघर्षाची माहिती दिली. तथापि, दीड तास झाला तरी पोलीस फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झालाच नाही. केवळ भामई पोलीस चौकीचे दोन पोलिस व एक गृहरक्षक घटनास्थळी आले. परंतु, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. ट्रक मालक महिला पालकांना मारहाण करण्याची भाषा करीत होते. वाहतुकीची एक खेप चुकल्याचे तुणतुणे वाजवत होते. पालक मात्र शांतपणे, "आम्ही खनिज माल वाहतुकीच्या विरोधात नाही; परंतु, ही खनिज माल वाहतूक मार्गदर्शक नियमांचे पालन करून व्हायला हवी; खनिज माल रस्त्यावर सांडून धूळ प्रदूषण होता कामा नये; या धूळ प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, असे त्यांना सांगत होते.
दरम्यान, यावेळी उसगाव भागातील ट्रक मालकही या ठिकाणी दाखल झाले व त्यांनीही स्थानिक ट्रकमालकांचीच तळी उचलून धरून पालकांशी संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला.
सकाळी १०.३५ वाजता पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस व डिचोलीचे मामलेदार प्रमोद भट आंदोलनस्थळी दाखल झाले. वातावरणातील तणाव पाहून प्रमोद भट यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्वरित पोलिसांची कुमक पाठविण्याचा आदेश दिला. त्यांनी धूळ प्रदूषणाच्या या समस्येसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असे आश्वासन, यावेळी आंदोलनकर्त्या पालकांना दिले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पालक शिक्षक समितीसोबत डिचोली मामलेदारांनी बैठक घेतली. यावेळी पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस, दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिवाकर दळवी, मुख्याध्यापक व्यंकटेश कुलकर्णी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक, तसेच डॉ. प्रमोद सावंत, लक्ष्मीकांत परब, प्रेमानंद चावडीकर, रघुवीर आसोलकर, श्री. भोसले व पालक शिक्षक संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
क्षमतेपेक्षा जादा ढिगारे करून केली जाणारी खनिज माल वाहतूक बंद करायला हवी. या खनिज माल वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. रस्त्यावर सांडलेली खनिज माती पाण्याचे फवारे मारून दररोज साफ करणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलताना आमदार प्रताप गावस म्हणाले.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक यांनी यावेळी धूळ प्रदूषणासंदर्भात यापूर्वी संबंधितांशी केलेल्या पत्रव्यवहारांची कागदोपत्री माहिती मामलेदार प्रमोद भट यांना दिली व धूळ प्रदूषणाची समस्या न सुटल्यास या विद्यालयाला पुढे विद्यार्थी मिळणे कठीण होईल, असे सांगितले. ही समस्या न सुटल्यास पालकांना त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असे यावेळी काही पालक म्हणाले. नियमांची पायमल्ली करून खनिज माल वाहतूक करणाऱ्या टिपर ट्रकांवर वाहतूक कायदा नियमांनुसार कठोर कारवाई केल्यास ते वठणीवर येतील असेही मत यावेळी व्यक्त केले गेले.
दरम्यान, आज सायंकाळी या भागातील धूळ प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डिचोली मामलेदार कार्यालयात विविध खनिज आस्थापनांचे पदाधिकारी, श्रीमती ताराबाई दळवी विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक, पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस यांना मामलेदार प्रमोद भट यांनी खास बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीतील अंतिम निर्णय समजू शकला नाही.

No comments: