Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 4 December, 2010

महानंदच्या खुनांची संख्या २४?

१६ व्या खुनानंतर दिला ‘पूर्णविराम’

अंगना शिरोडकर प्रकरणाशी
‘सीरियल किलर’चे संबंध



प्रीतेश देसाई
पणजी, दि. ३
क्रूरकर्मा महानंद नाईक याने १६ नव्हे तर तब्बल २४ खून केले असून त्याची यादीच फोंडा पोलिसांकडे आहे. परंतु, वरिष्ठ पोलिसांच्या हरकतीमुळे आकडा १६ वर पोचताच तपासकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. यात, अंगना शिरोडकर खून प्रकरणातही महानंदचा हात असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते. १६ खुनानंतर १७ वा खून उघड झाला असता तर तो अंगना शिरोडकर हिचा असता. मात्र, त्याचवेळी वरिष्ठ अधिकार्‍यांनी या तपासकामाला ‘लाल झेंडा’ दाखवल्याने ही माहिती बाहेर येऊ शकली नाही, अशी माहिती पोलिस खात्यातील वरिष्ठ सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
अंगना शिरोडकर खून प्रकरणात महानंदचा वापर करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. या खून प्रकरणात शिरोडा भागातील एका राजकीय व्यक्तीच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. तसेच, या लोकांशी महानंद व त्याच्या पत्नीचे घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा शिरोडा भागात सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुन्हा एकदा महानंद नाईक याला पोलिस कोठडीत घेऊन चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महानंद नाईक याला तरुणींच्या अंगावरील सोने लुटून त्यांचा गळा आवळायची चटक लागली होती. अंगना शिरोडकर ही मूळ शिरोडा येथे राहणारी. तिला म्हापसा या ठिकाणी शिक्षिकेची नोकरी लागल्याने ती बिठ्ठोण भागात भाड्याच्या खोलीत राहत होती. अंगनाचे मारेकरी ज्या स्कूटरवरून आले होते त्याच प्रकारची स्कूटर महानंद वापरत होता, असेही प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले होते. पण, एका मागोमाग खुनांची ही लांबलचक यादी बाहेर आल्यास पोलिस खात्याची बदनामी होईल, या भीतीने वरिष्ठांनी महानंदची चौकशी थांबवली, असे सांगण्यात येत आहे.
महानंदने ज्या १६ तरुणींचा खून केला त्याची माहिती पोलिसांना देताना त्याने हेतुपुरस्सर पोलिसांनी दिशाभूल केल्याचे न्यायालयीन सुनावणीत उघडकीस येत आहे. खून करण्यात आलेल्या तरुणींचे हाडांचे सापळे दाखवताना त्याने नावांची अदलाबदल केली. त्यामुळे ‘डीएनए’ चाचणीत फरक आढळून आला. मात्र, त्या ‘डीएनए’ अहवालांची योग्य जुळवाजुळव करण्यासाठी महानंदला पुन्हा एकदा पोलिस कोठडीत घेऊन चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
१६ खुनांचे तपासकाम वेगवेगळ्या पोलिस स्थानकात विभागून घातल्यानेही तपासकामाला फटका बसला आहे. यामुळे ‘सीरियल किलर’ महानंदची कार्यपद्धत न्यायालयात सिद्ध करण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागत आहे. एकाच पोलिस स्थानकावर किंवा एकाच पोलिस पथकाने या संपूर्ण प्रकरणाचे तपासकाम केले असते तर मृतदेहाच्या नावांत अदलाबदल करून ‘डीएनए’ चाचणीनंतरही सहीसलामत सुटण्याच्या महानंदच्या क्लृप्तीवर विरजण पडले असते. तब्बल ७ खुनात महानंद दोषमुक्त ठरवला गेल्याने आता पोलिस खाते कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments: