Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 29 November, 2010

आगामी निवडणूक नावेलीतूनच

चर्चिल यांचे लुईझिन यांना खुले आव्हान

मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी) : गोवा विधानसभेची आगामी निवडणूक आपण नावेली मतदारसंघातूनच लढवणार आहोत, असे स्पष्ट करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आपले प्रतिस्पर्धी तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना जबरदस्त आव्हान दिले आहे.
निवडणूक होण्यास अजून सुमारे वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्यानिमित्ताने विविध मतदारसंघांत निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच चर्चेत असणारे मंत्री चर्चिल यांनी, कॉंग्रेसने तिकीट दिले अथवा नाही तरी आपण नावेलीतूनच निवडणूक लढवणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याची गर्जना केली आहे.
लुईझिन फालेरो व आपणामधील वितुष्ट अजूनही कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चिल कॉंग्रेसमधून बाहेर पडतील अशी जी भाकिते केली आहेत त्यालाही बळकटी मिळत चालली आहे.
कॉंग्रेसश्रेष्ठींनी आगामी निवडणुकीत नावेलीसाठी लुईझिन यांची उमेदवारी पक्की करताना चर्चिलना बाणावलीत जाण्याची सूचना केली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तेथून वालंकाचा पत्ता कापला गेला आहे. त्यावरून राजकीय गोटात नव्या चर्चेला उत आला आहे. मात्र चर्चिल यांनी तो मुद्दाच फेटाळून लावताना नावेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्का केल्याने त्यांच्या विरोधकांवर बचावाचा पवित्रा घेण्याची पाळी आली आहे.
नावेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आपणाला कोणत्याही पक्षाच्या तिकीटाची गरज नाही; कॉंग्रेसच्या तर नाहीच नाही. गेल्या निवडणुकीत आपण त्या पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला होता तेव्हा त्या पक्षाचे तिकीट माझ्याकडे कोठे होते, असा सवाल चर्चिल यांनी केला आहे. ती निवडणूक आपण विरोधी पक्षाच्या बॅनरखाली लढविली होती याची आठवण त्यांनी करून दिली.
फालेरो यांना नावेलीतून उमेदवारी देण्बाबत श्रेष्ठींकडून आपणाला कोणताच संदेश मिळाला नसल्याचे चर्चिल यांनी स्पष्ट केले. काही लोकांना अशा कंड्या पिकविण्याची सवय आहे. आपण बाणावलीतून निवडणूक लढविण्याचे कोणी स्वप्नादेखील पाहू नये. कॉंग्रेसश्रेष्ठी आपणाला नावेलीतूनच तिकीट देतील. वालंकाच्या उमेदवारीबाबत तूर्त मी काहीही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान नावेली प्रमाणेच कुडचडे मतदारसंघही सध्या चर्चेत असून तेथील विद्यमान आमदार श्याम सातार्डेकर यांचे उजवे हात गणले जाणारे मित्र दिनेश काब्राल यांनी त्यांच्यापासून फारकत घेऊन आगामी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सातार्डेकर अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. सातार्डेकर व काब्राल यांची गेल्या १७ वर्षांतील मैत्री पालिका निवडणुकीतील घटनांतून संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. काब्राल हे अन्य कोणत्या पक्षाच्या तिकीटावर वा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले तर ते सातार्डेकर यांना महागात पडू शकते.
दरम्यान, नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी आपला कुंकळ्ळी मतदारसंघ आपल्या पुत्रासाठी सोडून सांगे मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने बाणावली, नावेलीमागोमाग कुंकळ्ळी व सांगे असे कौटुंबिक राजकारण आगामी निवडणुकीत दृष्टीस पडेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

No comments: