Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 September, 2010

अटालाप्रश्नी सरकारची विश्वासार्हता संपुष्टात

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी): अटाला प्रकरणावरून गोवा सरकारची विश्र्वासार्हताच संपुष्टांत आलेली आहे व म्हणून मुख्यमंत्री असो वा गृहमंत्री असो, त्यांना त्याबाबत जनतेनेच निवडणुकांतून त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. आपण त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत नाही, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले. सरकारने प्रथम अटालाला जाऊ दिले व तो देशाबाहेर गेल्याची खात्री झाल्यावर नंतर "रेड कॉर्नर' नोटिस जारी केली, या आपल्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला व सांगितले की पोलिसांची त्यात काहीच चूक नसेल तर आता "रेड कॉर्नर' का जारी केली. न्यायालयाकडे बोट दाखवून सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही असे त्यांनी बजावले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल अटालाप्रकरणी जी गोवा पोलिसांना "क्लीन चीट' दिली आहे, त्याबाबत विचारता पर्रीकर म्हणाले की, गोवा सरकारात कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाही, सगळा गोंधळ माजलेला आहे. अकार्यक्षम व भ्रष्ट लोकांच्या हातात सत्ता गेली की हे असेच व्हायचे.
सरकारने संगणक शिक्षकांना सेवेत कायम करण्याचा जो निर्णय घेतला, त्याबाबत ते म्हणाले की यावरून आपल्या सरकारने त्यांना कामावर घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो वैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना गोव्यासाठी योग्य नाही, त्यासाठी सरकारला येथील परिस्थितीशी मिळतीजुळती अशी एखादी योजना आखावी लागेल, असे ते म्हणाले.

No comments: