Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 September, 2010

जिवंत वीजवाहिनी पडून पेडण्यात ६ गुरे दगावली

पेडणे दि. ५ (प्रतिनिधी) - पेडणे परिसराला जुनाट वीजतारांचा दणका बसणे सुरूच आहे. तुये येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर (आयटीआय) शनिवारी रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ११ केव्हीची जिवंत वीज तार तुटून अंगावर पडल्याने ४ म्हशी आणि दोन बैल जागीच ठार झाले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान होऊन त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीज खात्याच्या या भोंगळ कारभाराबद्दल पेडणे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या दुर्घटनेची माहिती वीज खात्याला रविवारी सकाळी माहिती मिळाल्यानंतर वीज अभियंता एम. एम. शिरुर यांनी याविषयी पेडणे पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याविषयी कळविले. स्थानिक पोलिस कॉन्स्टेबल संतोष परब व जयराम म्हामल यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यामुळे सुमारे १ लाखांहून जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेविषयी पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तसेच त्यांनी या घटनेविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त करून संबंधित शेतकऱ्यांना विनाविलंब नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आदेश वीज अभियंते एम. एन. शिरुर यांना दिले. तसेच मुख्यमंत्री निधीतूनही संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
मृत म्हशी या पेडणे येथील असून त्यांच्या मालकांची नावे अधिकृतपणे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. या दुर्घटनेत मरण पावलेल्या बैलांचे मालक हे विर्नोडा येथील कृष्णा मोरजकर व सिद्धार्थ मोरजकर आहेत. त्यांचे सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याविषयी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार दयानंद सोपटे यांनी सरकारच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली आहे. सुमारे २० - २५ वर्षांपूर्वीच्या वीजतारा बदलण्याविषयी सरकारकडे वारंवार मागणी करूनसुद्धा झोपी गेलेले सरकार काहीच करत नाही. तुये औद्योगिक वसाहतीसाठी पेडण्याहून वीजपुरवठा केला जातो. त्या वाहिन्या जंगलातून जातात. वास्तविक त्या भूमिगत असणे अत्यंत गरजेचे आहे. तशी "सुबत्ता' केव्हा येईल हे देवालाच ठाऊक. निदान या जीर्ण वीजतारा तातडीने बदलल्या गेल्या तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया या भागातून उमटत आहेत. सदर वीजवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव खात्याकडे पडून आहे. खात्याचे उत्पन्न वाढीव दाखविण्याच्या नादात खर्चात नियंत्रण आणल्याने तालुक्यात मानवी व जनावरांचे बळी वाढत चालले आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वीजमंत्र्यांनी खास निधीची तरतूद पेडणे तालुक्यासाठी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान ही घटना तुये पंचायत क्षेत्रात घडल्याने तुयेच्या सरपंच सौ. विजयलक्ष्मी नाईक व पंच ज्योकिम फर्नांडिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत जनावरांची विल्हेवाट लावली.
ऐन चतुर्थीच्या तोंडावरच..
ऐन चतुर्थीच्या काळात नांगरणीसाठी जुंपण्यात येणारे बैलच गमवावे लागल्याने चतुर्थीनंतर सुरू करावयाची वायंगण भातशेती कशी करावी, असा बाका प्रसंग या शेतकऱ्यांवर ओढवला आहे. बैल म्हणजे शेतकऱ्याचा जिवाभावाचा मित्र. त्याच्या बळावरच शेतकरी पिके घेत असतो. आता सरकारी मदत केव्हा मिळणार, याकडे या बळिराजाचे लक्ष लागले आहे.

No comments: