Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 September, 2010

अखेर बिहारमधील ओलिसनाट्य संपले

तिन्ही अपहृत पोलिस परतले

लखीसराय/पाटणा, दि. ६ - माओवादी आणि पोलिस यांच्यातील सलग नऊ दिवसांच्या ओलिसनाट्याचा आज सुखद शेवट झाला. एका पोलिसाला ठार केल्यानंतर तीन दिवसांनी माओवाद्यांनी उर्वरित तीन पोलिसांची आज सुखरूप सुटका केली. त्यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमारांसह सर्व अपहृतांच्या नातेवाईकांचाही जीव भांड्यात पडला.
उपनिरीक्षक अभयप्रसाद यादव, रुपेशकुमार सिन्हा आणि बिहार लष्करी पोलिस शिपाई एहसान खान या तिघांची आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास माओवाद्यांच्या तावडीतून सुटका झाली. विशेष म्हणजे, ही सुटका बिनशर्त झाली. तिघेही पोलिस आज सुखरूप घरी परतले. या ओलिस नाट्यामुळे जवळपास ९ दिवसांपासून मुख्यमंत्री नितीशकुमार आणि संपूर्ण राज्य प्रशासनच प्रचंड तणावाखाली वावरत होते. ओलिस असणाऱ्या पोलिसांचे नातेवाईक, सुरक्षा दल आणि इतर राजकीय पक्ष यांच्या दबावामुळे नितीशकुमार सरकार सकारात्मक तोडगा काढण्यासाठी धडपडत होते. अखेर या पोलिसांची बिनशर्त सुटका झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, एका पोलिसाचे मारले जाणे हा यातील एक अतिशय दु:खद भाग ठरला.
माओवाद्यांनी गेल्या रविवारी एकूण चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात माओवाद्यांनी आपल्या आठ साथीदारांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. पण, ही मागणी पूर्ण करण्याची वेळ सुदैवाने प्रशासनावर आली नाही. त्यामुळे आज अपहृत पोलिसांच्या नातेवाईकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. परत आलेल्या पोलिसांच्या घरी तर जल्लोषाचे वातावरण होते.
केवळ देवाच्या कृपेनेच वाचलो
ज्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी लुकास टेटे या पोलिसाचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी आज माओवाद्यांनी या तिघांना सोडले. त्यांना सोडताना माओवाद्यांनी पोलिसांना फोन करून आम्ही अपहृतांना अमूक ठिकाणी सोडत असल्याचे कळविले, हे विशेष. पोलिसांच्या ताफ्याने या तिघांना लखीसराय पोलिस ठाण्यात आणले. तेथून त्यांना आपआपल्या घरी रवाना करण्यात आले.
हे तिघे परत येताच २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या ओलिस नाट्यावर आज अखेर पडदा पडला.

No comments: