Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 10 September, 2010

झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट उठवली

अर्जुन मुंडा यांचा उद्या शपथविधी

नवी दिल्ली, दि. ९ - झारखंडमध्ये सरकार स्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचाली पाहून आज केंद्रीय मंत्रिमंडळाने तेथील राष्ट्रपती राजवटीबाबतचा निर्णय फिरविला आहे. त्यामुळे आता तेथे भाजप-झामुमो आघाडीचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपालांनी अर्जुन मुंडा यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले असून ११ सप्टेंबर रोजी मुंडा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. ते म्हणाले की, राज्यपालांनी केलेल्या शिफारसीच्या आधारे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवट हटविण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. आता तेथे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.
झारखंडमध्ये १ जून रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. संपुआ सरकारविरुद्धच्या कपात सूचनेवर संसदेत मतदानाचे वेळी शिबू सोरेन यांनी संपुआच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे भाजपने राज्यातील त्यांच्या सरकारचे समर्थन काढून घेतले होते. त्यानंतर कोणताही पक्ष सरकार स्थापनेसाठी समोर आला नव्हता.
आता पुन्हा तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भाजपा-झामुमो हे पक्ष सरकार स्थापनेसाठी पुढे सरसावले आहेत. यावेळी अर्जुन मंुंंडा या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. त्यासाठीचा दावाही त्यांनी काल झारखंडच्या राज्यपालांना सादर केला. या घटनाक्रमामुळे राज्यपालांनी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राष्ट्रपती राजवट हटविण्याची शिफारस केली.
राज्यपालांनी आजच्या घडामोडीनंतर अर्जुन मुंडा यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले आहे. सोबतच त्यांना सात दिवसांच्या आत विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अर्जुन मुंडा यांचा शपथविधी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील कोणकोणत्या सहकाऱ्यांचा शपथविधी होणार हे मात्र अजूनही जाहीर झालेले नाही.

No comments: