Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 September, 2010

पालिका निवडणूक तरी जिंकून दाखवा

राष्ट्रवादीचे आमोणकरांना आव्हान
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे युथ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांचा आज राष्ट्रवादीचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी खरपूस समाचार घेतला. संकल्प आमोणकर यांना राजकारणाची जाण नसल्यानेच त्यांनी अशा प्रकारची टीका केली असून हिंमत असेल तर त्यांनी येत्या पालिका निवडणुकीत तरी निवडून येऊन दाखवावे, असे प्रतिआवाहन राष्ट्रवादीने त्यांना दिले आहे.
संकल्प आमोणकर यांनी कॉंग्रेसच्या मदतीशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे फिलीप यांनी वास्कोत निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान दिले होते. युतीच्या सरकारात असताना चाळीसही मतदारसंघात उमेदवार उतरवणार असल्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावर त्यांनी काल जोरदार टीका केली होती.
युतीच्या सरकारवर बोलण्याचा युथ कॉंग्रेसला कोणताही अधिकार नाही. प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. आम्ही त्या दिशेने प्रयत्नशील असून त्यावर टीका करण्याचे युथ कॉंग्रेसला कारण नाही. येत्या निवडणुकीत आम्ही आमच्या शक्तीनुसार अधिक जागा मागणार असल्याचेही श्री. डिमेलो यावेळी म्हणाले. ते आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष उल्हास नाईक व सरचिटणीस राजन घाटे उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक मतदारसंघात ब्लॉक समित्या आहेत. त्यांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मग राष्ट्रवादीचे काम वाढत असेल तर त्याला का विरोध करण्यात येतो, असे ते म्हणाले. मागील इतिहास पाहिल्यास संकल्प आमोणकर यांना आव्हानच स्वीकारता येत नसल्याचे स्पष्ट झाल्याची टीका त्यांनी केली. आयटी हेबिटॅट विषयात आंदोलन करण्यासाठी गेलेल्या युथ कॉंग्रेसने ताळगाव येथे मार खाल्ल्यानंतर तेथे हरवलेली त्यांची चप्पल त्यांना अद्यापही सापडलेली नाहीत. युथ कॉंग्रेसने ज्या राजकीय नेत्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती, त्याच नेत्याला कॉंग्रेस पक्षाने पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आमोणकर यांनी मोठ्यांच्या राजकारणात न पडता, केवळ युवकांच्याच प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. वास्को मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी त्याचे हे टीका सत्र सुरू असून त्यांनी काहीही केले तरी त्यांना तिकीट मिळू शकत नाही, असा दावा यावेळी ट्रॉजन यांनी केला.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीमूळे हातातून गेली या टीकेवर बोलताना ट्रॉजन म्हणाले की, त्यापूर्वीच्या निवडणूक कॉंग्रेस पक्षाने केवळ ९० हजार मते मिळवली होती. यावेळी राष्ट्रवादीने १ लाख ३५ हजार मते मिळवली आहेत. युथ कॉंग्रेसमध्ये असलेल्या काही नेत्यामुळेच विजय प्राप्त होऊ शकला नाही, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष हा पूर्ण भ्रष्ट्राचारी पक्ष आहे हे संकल्प आमोणकर यांनी आपल्या पक्षात एजंट आणि राष्ट्रवादीचे सल्लागार असल्याची टीका करून उघड केले आहे. हिंमत असेल तर हे कोण एजंट आहेत त्यांची नावे आमोणकर यांनी उघड करावी. त्यांना राष्ट्रवादीत समावेश करून घेता येईल का, यावर विचार केला जाईल, असेही ट्रॉजन यावेळी म्हणाले.
-------------------------------------------------------------
काणकोण मदतनिधीचा असाही घोटाळा...!
काणकोण येथे आलेल्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी यूथ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी गोळा केलेला निधी अद्याप त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही, असा आरोप ट्रॉजन यांनी केला. कोणकोण पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी युथ कॉंग्रेसने किती निधी गोळा केला, तसेच तो कधी आणि कोणाला वाटण्यात आला हे जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीने दिले आहे. त्याचप्रमाणे, श्री. आमोणकर यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजीविक्रेत्यांकडून पैसे गोळा करून वाढदिवस साजरा केला असल्याचा आरोपही यावेळी ट्रॉजन यांनी केला. हे सर्व आरोप खुद्द युथ कॉंग्रेसच्याच एका पदाधिकाऱ्याने केले असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी जोडली. युथ कॉंग्रेसने युवकांचे कोणतेही विषय हाती घेतलेले नाही. युथ कॉंग्रेसचेच सुनील कवठणकर यांच्यावर हल्ला झाला तरी, युथ कॉंग्रेस मूग गिळून गप्प बसली. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याचे रॅगिंग झाले त्याहीवेळी युथ कॉंग्रेसने काहीही केले नाही, असेही ते म्हणाले.

No comments: