Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 9 September, 2010

"ते' पैसे काणकोण पूरग्रस्तांसाठी नव्हतेच

राष्ट्रवादीच्या आरोपावर कॉंग्रेसचा गुळमुळीत खुलासा

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - कॉंग्रेस पक्ष आणि युवक कॉंग्रेसने काणकोण येथे पूर आल्यानंतर जमा केलेले पैसे हे काणकोणमधील पूरग्रस्तांसाठी नव्हे तर
तर, गोव्यात अन्यत्र नैसर्गिक आपत्ती आल्यास तेथे सदर निधी वापरायला मिळेल, या हेतूने जमा केले होते. निधी गोळा करण्यासाठी काणकोण हे केवळ निमित्त होते, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस पक्षाने दिले!
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल युवक कॉंग्रेसवर काणकोण निधीत घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कॉंग्रेसने आज या आरोपांना सामोरे जाण्यासाठी एन. शिवदास यांना प्रवक्ते म्हणून पुढे केले. ते पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी पक्षाचे उपाध्यक्ष कांता गावडे, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर, सुवासिनी गोवेकर व विजय पै उपस्थित होते.
कॉंग्रेसची बाजू मांडताना एन. शिवदास यांनी अकलेचे तारे तोडले. पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाताना त्यांना अक्षरशः घाम फुटला. त्यामुळे त्यांच्या बाजूला बसलेल्या कांता गावडे यांनी पूर कसा अचानक आला, त्याचे स्वरूप किती भयानक होते, आदी माहिती देण्यास सुरुवात केली. एक वर्ष झाले तरी, कॉंग्रेसतर्फे पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेला निधी पीडित लोकांपर्यंत पोहोचलेलाच नसल्याचे उघड झाले आहे.
त्यावेळी ते पैसे गोळा करण्यासाठी काणकोणचा कोणताही संदर्भ नव्हता. ""गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटी (जीपीसीसी) आपत्कालीन व्यवस्थापन'' या नावाने गोळा केलेले ते १८ लाख रुपये म्हापसा अर्बन बॅंकेत जमा असल्याची माहिती शिवदास यांनी दिली. मात्र हा निधी बॅंकेच्या कोणत्या शाखेत जमा असून त्याचा खाते क्रमांक काय हे सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. या पैशांत कोणताही घोटाळा झालेला नसून राष्ट्रवादीने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे एन. शिवदास म्हणाले.
युवक कॉंग्रेसने जमा केलेला सुमारे १० लाख रुपयांचा निधी कॉंग्रेस पक्षाकडे दिला होता, असे यावेळी संकल्प आमोणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
काणकोणमध्ये पूर आल्यानंतर वर्तमानपत्रात आवाहन करून निधी गोळा करूनही ते पैसे काणकोणसाठी जमवले नव्हते यावर तुम्ही ठाम आहात का, असा प्रश्न त्यांना केला असता, चतुर्थी व दिवाळीच्या काळात या निधीचे वाटप काणकोण पूरग्रस्तांना केले जाणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
अनेक लोकांनी तसेच कॉंग्रेस पक्षाने काणकोण पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यांना घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे आम्ही आता या पैशांतून त्यांना टेबल, कपाट यासारखे गृहोपयोगी साहित्य देणार आहोत, असेही ते म्हणाले. तुम्ही किती पूरग्रस्तांना मदत करणार आहात, असे विचारले असता आम्ही अद्याप त्याचे सर्वेक्षण केलेले नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.रंजक खुलासा अन् हास्याचे कारंजे..
ड्रग माफिया व पोलिस साटेलोटे प्रकरणावर कॉंग्रेसची भूमिका काय, असे विचारले असता, "पक्षाने मला त्यावर काहीही बोलू नको', असे बजावले असल्याचे "उद्गार'
एन. शिवदास यांना काढताच उपस्थित पत्रकारांत हास्याचे कारंजे उसळले. विशेष म्हणजे या वार्तालापाच्या आरंभीच आपण पक्ष प्रवक्ते आहोत, अशी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली!

No comments: