Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 5 September, 2010

विष्णू वाघ यांची ५ नाटके एकाच महिन्यात रंगमंचावर

नाट्यक्षेत्रातील आगळावेगळा विक्रम

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : सिद्धहस्त गोमंतकीय नाटककार विष्णू सूर्या वाघ यांची तब्बल पाच नाटके एकाच महिन्यात रंगमंचावर येत असून गोव्याच्या रंगभूमीच्या इतिहासात तो आगळावेगळा विक्रम ठरणार आहे.
श्री. वाघ यांच्या पाच नाटकांच्या मालिकेतील पहिले नाटक, "युद्ध नको मज बुद्ध हवा' दि. २ सप्टे. रोजी कला अकादमीच्या मा. रंगनाथ च्यारी स्मृती नाट्यमहोत्सवात सादर झाले. या नाटकाची निर्मिती रूद्रेश्वर - पणजी या संस्थेतर्फे करण्यात आली असून देविदास आमोणकर यांनी त्यांचे दिग्दर्शन केले आहे.
श्री. वाघ यांचे दुसरे नाटक "हलो हांव उलयतां' राजदीप नायक यांच्या कला चेतना या संस्थेतर्फे रंगमंचावर येत असून प्रेमानंद गुरव यांनी त्याची निर्मिती केली आहे. प्रमोद म्हाडेश्वर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा शुभारंभी प्रयोग दि. १३ सप्टेंबर रोजी खोल - काणकोण येथील सार्वजनिक गणेशोत्सवात होणार आहे. त्याचे २० सप्टेंबरपर्यंत गोव्यात विविध ठिकाणी एकूण आठ प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
डोंगरी येथील नटराज क्रिएशन्स या संस्थेतर्फे श्री. वाघ यांचे "तीन तिके-अमुरपिके' हे विनोदी कोकणी नाटक १६ सप्टेंबरपासून रसिकांच्या सेवेत दाखल होईल. या नाटकाचे दिग्दर्शन जयेंद्रनाथ हळदणकर यांनी केले आहे.
श्री. वाघ यांचे चौथे नायक मुंबईतील श्री कलाई या संस्थेतर्फे निर्मित करण्यात आले असून रंगभूमी व चित्रसृष्टीतील प्रतिभावंत दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज यांनी ते दिग्दर्शित केले आहे. प्रायोगिक रंगभूमीवर वेगळेपणाचा ठसा उमटवण्याची ताकद असलेले "मी तीच बाई आहे' हे नाटक १८ सप्टेंबरपासून रंगभूमीवर येणार आहे.
येत्या ३० सप्टेंबर रोजी कला अकादमीच्या "रंगमेळ रिपर्टरी' कंपनीतर्फे श्री. वाघ यांनी लिहिलेल्या व स्वत:च दिग्दर्शित केलेल्या सं. "अलख निरंजन' या नवीन संगीत संगीत नाटकाचा प्रयोग मा. दीनानाथ मंगेशकर कलामंदिरात सादर केला जाईल. या नाटकात रंगमेळचे कलाकार चमकणार आहेत. त्यातील नाट्यगीतेही जुन्या मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची स्मृती गाजवतील, असा विश्वास श्री. वाघ यांनी व्यक्त केला आहे.
वरील नाटकांखेरीज "प्राचीवरी ये भास्कर व ' बाई मी दगूड फोडते' ही आणखी दोन नाटके श्री. वाघ यांनी लिहिली असून ऑक्टो.-नोव्हे. दरम्यान ती रंगभमूीवर येतील. त्यांचे सध्या एका वेगळ्याच विषयावर आधारित वैराग्यमठ' या नाटकाचे लेखन सुरू असून "भारत अजिंक्य आहे' ही नाट्यकृतीसुद्धा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

No comments: