Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 7 September, 2010

सकारात्मक बातम्यांमुळेच "गोवादूत'ला आदराचे स्थान

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या हस्ते "विघ्नहर्ता' विशेषांकाचे प्रकाशन

तपोभूमी, कुंडई, दि. ६ - नकारात्मक बातम्यांनी मनुष्याची वृत्तीही तशीच बनते.अशा बातम्यांना नगण्य स्थान देऊन आणि सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देत "गोवादूत'ने अल्पावधीत जनमानसामध्ये मिळविलेले स्थान प्रशंसनीय आहे. याच उज्ज्वल वाटचालीतील "विघ्नहर्ता विशेषांका'चे प्रकाशन करताना आपणाला अत्यानंद होत आहे, असे उद्गार तपोभूमीचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य यांनी आज येथे संध्याकाळी काढले. स्वामींच्या हस्ते "गोवादूत'च्या "विघ्नहर्ता विशेषांका'चे प्रकाशन झाले. यावेळी संपादक राजेंद्र देसाई, डॉ. प्रमोद पाठक, कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे, कार्मिक व्यवस्थापक विलास कामत, जाहिरात व्यवस्थापक सुरेंद्र काकोडकर, लेखाधिकारी बन्सिलाल शिरोडकर, तांत्रिक विभाग प्रमुख राजू पवार, संजय सालोस्कर उपस्थित होते. तपोभूमी ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र नाईक तसेच बटू यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
बहुतेक वृत्तपत्रे केवळ वार्षिक धार्मिक कार्यक्रमांनाच प्रसिद्धी देतात, गोवादूतने सुरुवातीपासून नियमितपणे वाचकांची आध्यात्मिक भूक भागविण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यामुळेच या वृत्तपत्राला जनतेमध्ये वेगळे स्थान आहे. हे स्थान टिकविण्यासाठी गोवादूत परिवाराचे प्रयत्न स्तुत्य असून, देशोन्नतीसाठी मनुष्यामधील सत्प्रवृत्ती जागविण्याचे कार्य यापुढेही "गोवादूत' करील, असा विश्वास आपल्याला वाटत आहे. आज या विशेषांकाच्या निमित्ताने विघ्नहर्ताच तपोभूमीत अवतरल्याचा भास होतो आहे. या पुण्यभूमीत अशा अंकाचे प्रकाशन व्हावे, हा सुयोग आहे, अशा शब्दांत स्वामींनी आशीर्वाद दिला.
यावेळी राजेंद्र देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना, "विघ्नहर्ता'विशेषांकाचे प्रकाशन या पुण्यभूमीत स्वामींच्या हस्ते होत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. २००५ पासून दरवर्षी "गोवादूत' गणेश विशेषांक प्रसिद्ध करीत असून, दरवेळी वेगवेगळ्या संकल्पनेवर हा अंक काढला जातो, अशी माहिती त्यानी दिली. यावेळी गोवा आणि देशातील गणेशोत्सवांबरोबरच परदेशातील गणशोत्सवाचे स्वरूप स्पष्ट करणारा विशेषांक प्रकाशित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments: