Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 8 September, 2010

झारखंड मुक्ती मोर्चाचा बिनशर्त पाठिंबा

सरकार स्थापनेचा भाजपकडून दावा
रांची, दि. ७ : झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिबू सोरेन यांच्या नेतृत्वातील झारखंड मुक्ती मोर्चाने पुन्हा हातमिळवणी केली आहे. झामुमोने बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने आज सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
राजकीय संघर्षामुळे तीन महिन्यांपूर्वी या दोन्ही पक्षांचे सरकार कोसळल्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा या दोन पक्षांमध्येच सहमती झाल्याने राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या आहे. दरम्यान, भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्जुन मुंडा यांची निवड करण्यात आली असल्याने मुंडा यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन करण्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. राज्यात १ जूनपासून राष्ट्रपती राजवट आहे.
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते अर्जुन मुंडा यांनी आज दुपारी दीड वाजता राज्यपाल एम. ओ. एच. फारुख यांची राजभवनावर भेट घेतली व त्यांच्याकडे राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. यावेळी अर्जुन मुंडा यांच्यासमवेत भाजप प्रदेशाध्यक्ष रघुवर दास, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन आणि ऑल झारखंड स्टुडंटस् युनियनचे (एजेएसयू)विधिमंडळ पक्षनेते सुदेश माहतो आदी नेतेही उपस्थित होते. ८१ सदस्यांच्या राज्य विधानसभेतील ४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादीही अर्जुन मुंडा यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा करताना सोपविली.
""भाजपाचे नेते अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही राज्यपालांकडे सोपविले. झारखंड मुक्ती मोर्चा, एजेएसयू, संयुक्त जनता दल आणि दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वातील सरकारला राहील, असे आश्वासन देणारे पत्र आम्ही राज्यपालांना दिले. सरकार स्थापण्याचा दावा करणारे निवेदन दिल्यानंतर आमच्या या भेटीत राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय देण्याचे आश्वासन आम्हाला दिले,''अशी माहिती एजेएसयूचे अध्यक्ष सुदेश माहतो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सरकार स्थापन करण्याच्या भाजपाच्या दाव्यावर राज्यपाल कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ८१ सदस्यसंख्या असलेल्या झारखंड विधानसभेत भाजपा आणि झामुमो यांच्याकडे प्रत्येकी १८ सदस्य आहेत. एजेएसयू यांच्याकडे पाच, तर संयुक्त जनता दलाचे दोन सदस्य आहेत. चामरा लिंडा आणि विदेश सिंग या दोन अपक्ष सदस्यांनीही अर्जुन मुंडा यांना पाठिंबा देण्याची ग्वाही दिलेली आहे.
तत्पूर्वी रघुवर दास यांच्या राजीनाम्यानंतर भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी अर्जुन मुंडा यांची त्यांच्या जागी निवड करण्यात आली. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या आदेशावरून रघुवर दास यांनी मुंडा यांच्यासाठी पद रिक्त करून दिले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून अर्जुन मुंडा यांची निवड झाल्यानंतर रघुवर दास आणि अर्जुन मुंडा हे दोघेही झामुमोचे सर्वेसर्वा राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले. सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे करताना अर्जुन मुंडा यांच्यासमवेत रघुवर दास देखील उपस्थित होते. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि झामुमो हे एकत्रित येण्याची गेल्या दहा महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे. राज्यात गेल्यावषींच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या व यानंतर ३० डिसेंबर रोजी शिबू सोरेन हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, भाजपने त्यांचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सोरेन यांनी ३० मे रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. संसदेत भाजपने मांडलेल्या कपात प्रस्तावावरील मतदानाच्या वेळी शिबू सोरेन यांनी कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केल्याने राजकीय वादळ उठले होते.

No comments: