Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 August, 2010

मोठ्या वाहनांची सक्ती पर्यटक टॅक्सींसाठी नकोच

विरोधकांनी धरले वाहतूक मंत्र्यांना धारेवर
मोठ्या इंजिनाच्या वाहनाची सक्ती नाही - मुख्यमंत्र्यांचा खुलासा

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): राज्यातील पर्यटक टॅक्सींना किमान १००० सीसी इंजिनाची सक्ती करण्याच्या प्रस्तावाला विरोधी सदस्यांकडून कडाडून विरोध झाल्यानंतर आणि काही सत्तारूढ सदस्यांनीही विरोधकांच्या या म्हणण्याला पाठिंबा दिल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हा प्रस्ताव मान्य केला जाणार नसल्याचे अखेर जाहीर केले. मुख्यमंत्र्यांकडून तेव्हाच झालेल्या हस्तक्षेपामुळे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांची मात्र चांगलीच गोची झाली.
साळगावचे आमदार दिलीप परूळेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला एका तारांकित प्रश्नाद्वारे या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधून सरकारात हे काय चालले आहे, हे सरकार आम आदमीला पुरते संपविण्यासाठी नवनव्या योजना पुढे आणत आहे की काय, असे संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
राज्यातील पर्यटक टॅक्सींसाठी किमान १००० सीसी इंजिनचे बंधन घालण्याची योजना हे सरकार आखत असून सुरक्षेचे कारण देऊन गरीब टॅक्सीचालकांना पुरते संपवण्याचा सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही परूळेकर यांनी केला.
विरोधकांनी या विषयावर वाहतूकमंत्री ढवळीकर यांना चांगलेच फैलावर घेतले. परूळेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, दयानंद मांद्रेकर या सगळ्यांनीच ढवळीकर यांच्यावर यावेळी जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
एका बार्देश तालुक्यातच ९९ टक्के टॅक्सी चालक हे बहुजन समाजातील आहेत. टॅक्सींच्या इंजिनांची क्षमता वाढणे म्हणजे त्यांची किंमत वाढणे आणि किंमत वाढणे म्हणजे गरिबांना १००० सीसीची ५ लाखांहून अधिक वाहने विकत घेणे अशक्य करणे; जेणे करून या लोकांवर उपासमारीची पाळी येणे. शिवाय इंजिनांची क्षमता वाढवली तरी भाडेपट्टीचे दर वाढणार नाहीत हे बंधन तर आणखी जाचक. त्यामुळे हा प्रस्ताव कदापि मान्य करणे शक्य नसल्याचे श्री. परूळेकर यांनी ठासून सांगितले. गरीब लोक ६०० किंवा ८०० सी सी इंजीन क्षमतेची वाहने अडीच लाखांपर्यंत कशीबशी विकत घेत होते. सध्या तो व्यवसायही तितका किफायतशीर राहिलेला नाही. त्यात ही आणखी जाचक अट घालून सरकारने राज्यातील समस्त गरीब टॅक्सी चालकांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे, असेही ते म्हणाले.
या विषयाला आणखी वाचा फोडताना कोणाची तरी सोय करण्यासाठी आणलेली योजना आहे, कोणाचे तरी हित जपण्याचाच तो प्रकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केला. शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर यांनी त्याही पुढे जाऊन जर १००० सीसीचे इंजीन हवे असेल तर गाड्या खरेदीसाठी ७५ टक्के सबसिडी द्या, अशी मागणी केली.
ढवळीकर व विरोधकांची यावेळी चांगलीच जुंपली. कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनीही ढवळीकरांवर जोरदार टीका केली. गरिबांना ही नवी सक्ती अजिबात परवडणारी नसून आपण कालच मुख्यमंत्र्यांच्या कानी ही गोष्ट घातली असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर, हा निर्णय राज्य वाहतूक प्राधिकरणाने घेतला असल्याचे श्री. ढवळीकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी तो फेटाळून लावला. हे सर्व पैसे करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर मुख्यमंत्र्यांनी चर्चेत हस्तक्षेप करत अशा मोठ्या क्षमतेच्या गाड्यांची गरज नाही आणि सरकार असा कोणताही निर्णय घेणार नाही असे स्पष्ट करून विरोधकांना शांत केले.

No comments: