Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 1 August, 2010

दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

चार जेसीबी यंत्रे कार्यरत; पर्यटकांची घोर निराशा
पेडणे व सावंतवाडी, दि. ३१ (प्रतिनिधी) - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातील मोठी दरड कोसळून रस्ता सर्वप्रकारच्या वाहनांना पूर्ण बंद झाला असून आणखी किमान आणखी पंधरा दिवस घाटमार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दिलीप भावे यांच्या देखरेखीखाली दरडीचे दगड व माती रस्त्यावरून काढण्याचे काम चार जेसीबी यंत्रे लावून युद्धपातळीवर सुरू आहे. ही माहिती सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिली.
काल ३० जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता २०० मीटरपेक्षा जास्त उंचीवरून दरड कोसळली. त्यामुळे हा एकमेव रस्ता पूर्णपणे बंद झाला. साहजिकच गोव्याहून जाणाऱ्या पर्यटकांना आंबोलीतील प्रसिद्ध धबधबा ठिकाणाचा आस्वाद शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस आस्वाद घेता येणार नाही.
दरड कोसळली तेव्हापासून त्या ठिकाणी सावंतवाडीचे पोलिस अधीक्षक श्री. दाभाडे, उपनिरीक्षक विठ्ठल जाधव, निरीक्षक जगदीश श्रीहरी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. आज जिल्हाधिकारी विक्रमकुमार, स्थानिक आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्गचे आमदार राजन तेली, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व सर्व प्रकारची सरकारी यंत्रणा हजर होती.
यावेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गोव्यातील पत्रकारांना माहिती देताना सांगितले, युद्धपातळीवर काम करून रस्ता मोकळा केला जाईल. त्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी कार्यालयात भेट देऊन अधिक माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले, दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जनतेची व पर्यटकांची गैरसोय झालेली आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे. दरड लवकरात लवकर दूर करून रस्ता मोकळा केला जाईल. ज्या पद्धतीने दरड कोसळली ती दूर करण्यासाठी किमान आठ दिवस लागतील अशी शक्यता असली तरी किमान २-३ दिवसात काम युद्धपातळीवर करून समस्या सोडविली जाईल. ज्या ठिकाणी धोकादायक वळणे आहेत त्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करणार आहोत.
पर्यटकांना सूचना
आंबोली धबधब्याजवळ शनिवार व रविवार अशा दोन दिवसात मोठ्या प्रमाणात गोवा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून पर्यटक येत असतात. त्यात गोव्यातील पर्यटकांची संख्या जास्त असते. काही पर्यटक मात्र मद्यपान करून तेथे
दंगामस्ती करतात. त्यावेळी कायदासुव्यवस्था बिघडून नये म्हणून पोलिसांना कारवाई करावी लागते. सर्व प्रकारच्या पर्यटकांनी योग्य ते शासनाला सहकार्य करून पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन श्री. केसरकर यांनी केले.
दरम्यान पोलिस निरीक्षक श्री. दाभाडे यांनी पर्यटकांना
किमान ५ दिवस पर्यटकांनी या आंबोली घाटात येऊ नये असे आवाहन केले आहे. एकदा दरड कोसळली की आणखी दरडी कोसळण्याची शक्यता असते. किमान ५ दिवस या ठिकाणी कोणत्याही पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगून कुणीही धोका पत्करू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था रामघाट मार्गे केल्याचे सांगण्यात आले.
लाखोंचे नुकसान
दरड कोसळल्याने आंबोली परिसरात लहान मोठे स्टॉल, गाडे हॉटेल आदींना याचा जबर फटका बसला आहे. त्यांच्या दैनंदिन व्यवहारात नुकसान सोसावे लागत आहे. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असत. दरड कोसळल्याने त्याचा परिणाम संख्येवर व पर्यायाने आपल्या व्यवसायावर झाल्याची माहिती येथील एक व्यावसायिक सुनील आंबेकर यांनी दिली.
जसा व्यावसायिकांना या दरडीमुळे फटका बसला तसाच सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांनाही बसला आहे. वाहतूक ठप्प झाल्याने पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालकांना दूरवरचा विनाकारण प्रवास करावा लागला.
गोवेकर नाराज
शनिवार व रविवार असे दोन दिवस या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात तयारीनिशी गोवेकर आंबोलीला जातात. मात्र दरड कोसळल्याने त्यांना मुख्य धबधब्याकडे जाताच आले नाही. त्यामुळे काहींनी अलीकडच्या भागात असलेल्या छोट्या छोट्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटला.

No comments: