Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 5 August, 2010

नाट्यविद्यालयाच्या दुर्दशेचे दशावतार

स्थळ : गोवा कला अकादमी
पडद्यामागचे नाटक!
सांस्कृतिक धोरण असणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे, याचा फार मोठा गवगवा करण्यात येतो. "गोवा म्हणजे कलाकारांची खाण आहे' किंवा "गोव्याला नाट्यकलेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे' यांसारखी वापरून गुळगुळीत झालेली वाक्ये कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात सर्रास आपल्या कानी पडतात. मात्र गोमंतकीय कलाक्षेत्राचे नेतृत्व करीत असल्याचा दावा करणाऱ्या कला अकादमीच्या नाट्यविद्यालयाच्या दुर्दशेचे "दशावतार' पाहिल्यास वरील सगळी विधाने म्हणजे पोकळ बाता असून गोमंतकीय नाटकाचे भवितव्य काळेकुट्ट आहे, असे वाटू लागते. अर्थात, गोमंतकीय रंगभूमीचे भविष्य अंधःकारमय दिसावे एवढे येथील कलाकारांचे पूर्वसंचित करंटे खचितच नाही. मात्र कला अकादमीच्या नाट्यविद्यालयाचा भविष्यकाळ पूर्णपणे आणि भूतकाळ काही प्रमाणात काळोखात बुडालेला आहे, याबद्दल शंका असू नये.
नाटक हा गोमंतकीय लोकजीवनाचा श्वास आहे. नाटकावर गोवेकरांचे निस्सीम प्रेम आहे. गोव्यात दरवर्षी नाटकांचे दहा हजारांहून अधिक प्रयोग सादर होतात, असे अभिमानाने सांगितले जाते. मग अशा नाट्यप्रेमी गोव्याच्या एकमेव नाट्यविद्यालयातील तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी बंद करून एका वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची नामुष्की कला अकादमीवर ओढवावी यामागचे कारण काय? पुन्हा ज्या काळात हा अभ्यासक्रम बंद केला जातो त्याच काळात गोव्यातील विद्यार्थी गोव्याबाहेर नाट्यशिक्षण घेत असतात यात काही सुसंगती (की विसंगती) आहे काय?
तीन वर्षांनंतर यंदा हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जी माहितीपुस्तिका देण्यात आली आहे ती मात्र तब्बल ७ वर्षांपूर्वी छापलेली आहे! त्यानंतर २००७ साली हा अभ्यासक्रम बंद करण्यात आला आणि आता तीन वर्षांनी तो पुन्हा सुरू होतो आहे. अशा वेळी अभ्यासक्रम बंद का पडला, तो पुन्हा सुरू करताना काही बदल करणे आवश्यक आहे का, याबाबत थोडे आत्मपरीक्षण करावे, असे कला अकादमीला का वाटले नाही? जर वाटले असेल तर त्याचे प्रतिबिंब माहितीपुस्तिकेत कसे नाही उमटले? एका वर्षाचा अभ्यासक्रम तर सलग तीन वर्षे माहितीपुस्तिकेशिवायच चालवून दाखविण्याची किमया कला अकादमीने साधली!
मान्यता नसलेल्या विद्यापीठांचा सुळसुळाट वाढत असल्याने अशा बोगस विद्यापीठांपासून विद्यार्थ्यांनी सावध असावे, याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले जाते. कला अकादमीच्या नाट्य विद्यालयाला मात्र तेवीस वर्षांच्या काळात आपल्या अभ्यासक्रमाला विद्यापीठाकडून मान्यता मिळावी, असे का वाटले नाही? इतरत्र बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास पदवी मिळते, मात्र कला अकादमीच्या नाट्यविद्यालयाने इतकी वर्षे तीन वर्षांचा "पदविका' अभ्यासक्रम चालविण्यात धन्यता मानली. त्यात पुन्हा त्या पदविका अभ्यासक्रमालाही विद्यापीठाची मान्यता नाहीच! आता पाणी गळ्यापर्यंत पोहोचल्यावर तीन वर्षांच्या नाट्यविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी "इंदिरा गांधी भारतीय मुक्त विद्यापीठा'ची मान्यता कला अकादमी मिळविणार आहे! गोवा राज्याचे स्वतःचे विद्यापीठ असताना आणि कला अकादमीचा नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असताना इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठासारख्या दूरस्थ शिक्षण राबविणाऱ्या विद्यापीठाकडे जायची कला अकादमीला गरज वाटावी, हे अनाकलनीय आहे. परंतु याबाबत कला अकादमीच्या संचालिका पद्मश्री जोसलकर यांच्याकडे चौकशी केल्यास "कागदावरील डिग्रीला महत्त्व नाही, कलाकार घडविणे महत्त्वाचे' असे उदात्त विचार त्या व्यक्त करतात! म्हणूनच बहुधा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना सात-आठ वर्षे लागत असावीत, सात आठ तुकड्यांचा पदवीदान समारंभ एकावेळी आयोजित होत असावा, आणि एका वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या या वर्षीच्या तुकडीचा निकाल तयार झाला तरी मागील दोन तुकड्यांचा निकाल तयार होत नसावा!
कला अकादमीची प्रवेशप्रक्रिया हेसुद्धा एक विलक्षण दुर्बोध नाटक बनले आहे. कोणत्याही विद्यापीठाची मान्यता नसलेल्या या पदविका अभ्यासक्रमासाठी केवळ पदवीप्राप्त विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतात. मात्र, जर एखाद्या विद्यार्थ्याला नाटकाची कौटुंबिक पार्श्वभूमी असेल किंवा त्याच्याकडे असामान्य गुणवत्ता असेल तर त्याला बारावीनंतर प्रवेश देण्यात येतो! यामागे कोणते तर्कट आहे ते समजण्यास मार्ग नाही; असो. तीन वर्षांपूर्वी हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांअभावी बंद करावा लागल्यानंतर या वर्षी तो पुन्हा सुरू होत असताना प्रवेशासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले नसल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. या वर्षी तसेच यापूर्वीसुद्धा बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आलेला आहे, हे सत्य आहे. (अशा विद्यार्थ्यांची नावे येथे प्रसिद्ध करीत नाही, कारण गुणवान आणि होतकरू कलाकारांना चुकीच्या कारणासाठी प्रसिद्धी देणे आणि त्यांची बदनामी करणे अयोग्य ठरेल.) याबद्दल संचालिका पद्मश्री जोसलकर यांना विचारले असता, बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमासाठी कधीच प्रवेश देण्यात आलेला नाही, असे विधान त्यांनी कॅमेऱ्यासमोर केले! ज्या विद्यार्थ्यांनी कला अकादमीचा एका वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशा विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. याचे कारण काय, तर पदविका अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सर्वस्वी भिन्न असून प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा नाटकाच्या जुजबी शिक्षणासाठी आहे. जुजबी शिक्षण म्हणजे काय? ज्यांना नाटकाची तोंडओळख नाही, ज्यांना रंगमंचावर उभेही राहता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी असलेला अभ्यासक्रम! ज्या गोव्यातील "प्रत्येक घरात एक नाट्यकर्मी आहे,' तेथील तरुणाला रंगमंचावर उभे राहता यावे यासाठी खास प्रशिक्षण घ्यावे लागावे यासारखी शोकांतिका नाही! तशी आवश्यकता पद्मश्री जोसलकर यांना मनापासून वाटल्यास त्यात आश्चर्य नाही. कारण गोव्यात नाट्यविद्यालय सुरू होण्याआधी (म्हणजेच त्या येथे येण्याआधी) गोव्यातील नाटक मुंबईच्या नाटकांची नक्कल करण्यापुरतेच मर्यादित होते, असे त्यांचे ठाम मत आहे.
एकीकडे सांस्कृतिक मंत्री, जे योगायोगाने मुख्यमंत्रीही आहेत, गोमंतकीय कलेच्या विकासासाठी पैशाची अडचण कधीच भासू न देण्याचे आश्वासन देतात, सांस्कृतिक कार्यावर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करीत असल्याचे गोवेकर पाहत आहेत आणि अशा वेळी नाट्यविद्यालयाच्या संचालिका जोसलकर यांना नाट्यविद्यालय चालविण्यासाठी निधीची कमतरता जाणवते आहे! जर गोवा सरकारकडे बाहेरच्या कलाकारांना बोलावून त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी पैसे असतील आणि राज्यातील एकमेव नाट्यविद्यालयाला पुरेसा निधी देता येत नसेल, तर पाहुण्यांना पक्वान्ने वाढून घरच्यांना उपाशी मारण्याचे हे धोरण संतापजनक आहे, असेच म्हणावे लागेल. खरे कोण? मुख्यमंत्री दिगंबर कामत की नाट्यविद्यालयाच्या संचालिका पद्मश्री जोसलकर?
नाटकाला जशी पडद्यापुढची बाजू असते तशीच पडद्यामागचीही असते. रंगमंचावर सादर होणारी नाट्यविद्यालयाची नाटके रसिकांनी पाहिली आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय रसिकांनी घ्यायचा आहे. मात्र सहसा लोकांसमोर न येणारी बाजूही लोकांसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा खटाटोप.

No comments: