Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 4 August, 2010

स्थगनप्रस्ताव फेटाळल्याने विरोधक आक्रमक

जोरदार घोषणाबाजी आणि ठिय्याद्वारे निषेध व्यक्त
सभापतींकडून दोन वेळा कामकाज तहकूब फियोनाच्या आरोपांवर चर्चेची मागणी
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): सुमारे दीड वर्षापूर्वी कळंगुट किनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत सापडलेल्या स्कार्लेट किलींग या ब्रिटिश अल्पवयीन मुलीची माता फियोना हिने गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भात सभापतींनी स्थगन प्रस्ताव दाखल करून घेण्यास नकार दिल्याने संतप्त भाजप सदस्यांनी आज सभागृह डोक्यावर घेतले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत त्यांनी धाव घेतली. परिणामी सभापती प्रतापसिंह राणे यांना किमान दोन वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. या वेळी विरोधकांनी सरकारवर विविध आरोप करत चक्क सभागृहात जमिनीवरच ठिय्या मांडला.
राज्यातील पोलिस व ड्रगमाफिया साटेलोटे प्रकरणात आता राजकीय नेत्यांचेही नाव घेतले जात आहे. यापूर्वी अटालाची प्रेयसी लकी फार्महाऊस हिने ड्रग व्यवहारात गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. आता स्कार्लेटची आई फियोना हिने तर थेट गृहमंत्री रवी नाईक व रॉय नाईक यांचे ड्रग व्यवहारांशी संबंध आहेत, अशी अधिकृत जबानीच स्कार्लेट मृत्युप्रकरणी बाल न्यायालयात नोंदवल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांचे व त्यांच्या पुत्राचे नाव उघडपणे ड्रग व्यवहारात घेतले जाणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. यामुळे या प्रकरणाची "सीबीआय' चौकशी होणे गरजेचे आहे. खुद्द विरोधकांसह सरकार पक्षातील अनेक आमदारांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे. आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचीही तीच मागणी आहे. असे असताना "सीबीआय' चौकशीची घोषणा करण्यास सरकार टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल भाजपतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सादर केलेला स्थगन प्रस्ताव सभापती प्रतापसिंह राणे यांनी दाखल करून घेण्यास नकार दर्शविताच भाजप आमदारांनी जोरदार घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली. सभापती राणे यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. भाजप आमदारांनी मात्र या मागणीशी ठाम राहत सभागृहातच ठिय्या मांडला. दहा मिनिटांच्या कालावधीनंतर पुन्हा कामकाज सुरू होताच पुन्हा जोरदार घोषणा देण्यात आल्या. "कॉंग्रेस सरकार हाय हाय', "बहुजन समाजविरोधी सरकार हाय हाय', "कॅसिनो सरकार हाय हाय',"पर्सेंटेज सरकार हाय हाय', "ड्रग माफिया सरकार हाय हाय' तसेच "सीबीआय' चौकशी झालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा देत भाजप आमदारांनी संपूर्ण सभागृहच दणाणून सोडले. अखेर सभापती राणे यांना भोजनापर्यंतचे कामकाज तहकूब करणे भाग पडले.
ड्रगमाफिया, पोलिस आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे यावरून विरोधकांनी अशाच प्रकारे गदारोळ माजवत यापूर्वी किमान तीन वेळा कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले होते. आज पुन्हा जवळपास त्याच विषयावरून विरोध आक्रमक बनले. तीनवेळच्या सभागृह तहकूबीच्या वेळी गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र व ड्रगमाफिया यांच्यातील कथित संबंधांवरून विरोधकांनी गदारोळ माजवला होता. तर, कांदोळी किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेली स्कार्लेट हिची आई फियोना हिने सोमवारी बाल न्यायालयात जबानी देताना इतर काही जणांबरोबरच चक्क रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यासंदर्भाच चर्चा व्हावी अशी विरोधकांची आज मागणी होती. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यासंबंधीचा स्थगन प्रस्ताव सभापतींसमोर सादर केला होता. प्रश्नोत्तराचे कामकाज संपताच त्यांनी या प्रस्तावासंबंधी चौकशी केली असता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत सभागृहात चर्चा करता येणार नाही असे कारण देत आपण तो फेटाळला असल्याचे सभापतींनी जाहीर केले आणि गदारोळाला सुरूवात झाली.

No comments: